जबरदस्त ट्रेंड होत आहे #BechendraModi हा हॅशटॅग


अवघ्या काही दिवसांवर महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या असून भाजप उमेदवारांच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यस्त आहेत. अशातच त्यांना नेटकऱ्यांकडून विरोध होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पहिल्या भाषणाला मराठीमधून सुरुवात केली. पण अनेकांनी मोदींच्या या पहिल्याच सभेला विरोध केल्याचे इंटरनेटवर पहायला मिळाले होते. रविवारी रात्री मोदी भाषण संपवून परत गेल्यानंतरही ट्विटर इंडियावर #मोदी_परत_जा हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डींग होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत आता नेटकऱ्यांनी #BechendraModi हा हॅशटॅग सुरू केला आहे.


ट्विटर इंडियावर बुधवारपासूनच #BechendraModi हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या परिस्थितीवर भाष्य करत अनेक नेटकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मध्यंतरी देशातील सर्वात मोठी, सार्वजनिक तेल व वायू विक्री व विपणन कंपनी असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात बीपीसीएलचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली होती.


केंद्र सरकार या कंपनीतील निम्म्याहून अधिक, ५३ टक्के हिस्सा विक्रीची तयारी करत असून उत्सुक खरेदीदारांसाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात निविदा काढण्यात येणार आहे. या प्रक्रियेत देशातील खासगी इंधन व्यवसाय क्षेत्रात वरचष्मा असलेली मुकेश अंबानी यांचा प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीज समूह रस घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच सर्वांनी एमटीएनएल, बीएसएनएल सारख्या कंपन्यांच्या परिस्थितीवरूनही निशाणा साधला आहे.


केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी यापूर्वी अर्थसंकटाच्या फेऱ्यातील सार्वजनिक क्षेत्रातील तीन कंपन्या बंद करून मोडीत काढण्याचा अथवा त्यांच्या विलीनीकरणाचा पर्याय सरकारपुढे उरला असल्याचे सांगितले होते. वाणिज्यमंत्र्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एसटीसी), एमएमटीसी, प्रोजेक्ट अ‍ॅण्ड इक्विपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (पीईसी) या तीन कंपन्यांबाबत संकेत दिले होते.


त्यातच सध्या अनेक कंपन्यांची स्थिती चांगली नसून नेटकऱ्यांनी त्यावरून मोदींवर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. सध्या #BechendraModi हा हॅशटॅग ट्रेंड होत असून या माध्यमातून अनेकांनी मोदींवर टीका केली आहे. रोजगार, रस्ते यावर सरकार काही बोलत नसून यावर प्रश्न विचारला तर सरकार दुसऱ्या विषयांकडे लक्ष नेत असल्याचा आरोप काही नेटकऱ्यांनी केला आहे. तर बीएसएनएल, एमटीएनएल आणि रेल्वेच्या खासगीकरणाचा सरकारचा डाव असल्याचे म्हणत काही नेटकऱ्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Leave a Comment