सौरव गांगुलीकडे नाही या प्रश्नाचे उत्तर, म्हणाला मोदींना विचारा


नवी दिल्ली – टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि क्रिकेट विश्वात दादा म्हणून ओळखला जाणारा सौरव गांगुली आता भारतीय क्रिकेटचा सर्वेसर्वा झाला आहे. गांगुलीची गेल्या आठवड्यात बीसीसीआय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि आता तो 23 ऑक्टोबरला पदभार स्वीकारणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष होताच सौरव गांगुलीने आपली ध्येय सर्वांसमोर ठेवली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटकडे विशेष लक्ष देण्याचे त्याने म्हटले आहे. कोलकाता येथे माध्यमांशी झालेल्या चर्चेदरम्यान त्याला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधांवरही प्रश्न विचारला ज्याला त्याने एक रोचक उत्तर दिले.

सौरव गांगुलीने भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधावर थेट उत्तर दिले आणि तो म्हणाला की, पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या दोन देशांमधील मालिके बाबत निर्णय घेऊ शकतात. दादा म्हणाला, तुम्ही हा प्रश्न पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान यांना विचारला पाहिजे. नक्कीच, जेव्हा आम्हाला सरकारची परवानगी मिळेल तेव्हाच काहीतरी घडेल. माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर नाही.

2007 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका खेळली गेली नव्हती. हे दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषक स्पर्धेत एकमेकांविरूद्ध खेळतात. सौरव गांगुलीने स्पष्ट केले की सरकार जे काही बोलेल ते बीसीसीआय पाळेल.

दरम्यान पुढच्या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकतो. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषकातील सराव सामन्यात आयसीसीने भारत-पाकिस्तानशी सामना करण्याची योजना आखली आहे. पण, आत्तापर्यंत आयसीसी आणि बीसीसीआयबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. महत्त्वाचे म्हणजे टी २० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या गटात आहेत.

Leave a Comment