LiveWire या आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक बाइकचे उत्पादन हार्ले डेव्हिडसन कंपनीने बंद केले आहे. यासंदर्भातील वृत्त ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीने उत्पादन बंद करण्याचा निर्णय बाइकच्या चार्जिंग इक्विपमेंटमध्ये आलेल्या समस्येमुळे घेतला आहे. अशाप्रकारची समस्या काही बाइकमध्ये उद्भवली असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीने यावर घरांमधील लोअर व्होल्टेज आउटलेट्समध्ये चार्जिंग करताना समस्या उद्भवू शकते असे म्हटले आहे. ही बाब अंतिम गुणवत्ता तपासणीदरम्यान समोर आल्यानंतर उत्पादन आणि डिलिव्हरी बंद करण्याचा निर्णय घेतला व पुन्हा अतिरिक्त चाचण्यांना सुरूवात करण्यात आली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कंपनीकडून प्रोडक्शन पुन्हा केव्हा सुरू केले जाईल याबाबत अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही. या बाइकसाठी डीलरशिप्समध्येच चार्जिंग करण्याची सुविधाही कंपनीकडून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. बाइकच्या गुणवत्तेबाबत तडजोड केली जाणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
सर्वप्रथम २०१४ मध्ये कॉन्सेप्ट मोटरसायकल म्हणून कंपनीने LiveWire ही इलेक्ट्रिक बाइक सादर केली होती. त्यानंतर हा प्रोजेक्ट बराच चर्चेत राहिल्यानंतर अचानक गायब झाला. नंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये ही बाइक कंपनीने पुन्हा सादर केली. या बाइकची डिलिव्हरी सप्टेंबर महिन्यापासून कंपनीने सुरू केली होती. जवळपास ३० हजार डॉलर (सुमारे २२ लाख रुपये) या बाइकची किंमत आहे.