देखणा, हिरवाईने नटलेला खिमसर किल्ला


राजस्थान म्हणजे किल्ले, गड, वाळवंटाचे राज्य. रंगीलो राजस्थान अशी त्याची ओळख. जोधपूर आणि बिकानेर मार्गावर मधेच खिमसर् या गावात असलेला खिमसर किल्ला राजस्थानच्या अनेक किल्ल्यातला मेरुमणी असे म्हणता येईल. चोहोबाजूने वाळवंट आणि हिरवाईचा अभाव असलेल्या या राज्यातील खिमसर् किल्ला म्हणजे हिरव्यागार बगिच्यांनी, मोठे सरोवर आणि भोवताली सँड ड्युन नटलेला प्राचीन किल्ला आहे.


सुमारे ५०० वर्षापूर्वी राव करमजी यांनी हा किल्ला बांधला आणि त्यानंतर याचा अनेकदा नवी बांधकामे करून विकास केला गेला. सध्या या किल्ल्याच्या काही भागात हेरिटेज हॉटेल आहे तर काही भागात राजपरिवार राहतो. या किल्ल्यातील वास्तूकला अप्रतिम आणि भव्य असून त्यातून तत्कालीन वैभवाचे दर्शन घडते. किल्ल्यात प्रवेश करतानाच हिरवे बगीचे आणि हिरवळ पर्यटकांच्या मनाला गारवा देते. आतील मार्गावर अनेक स्तंभ, खांब, नक्षीदार मूर्ती आहेत. त्याची उत्तम देखभाल केली जाते.


राव जोधाजी यांचा ८ वा मुलगा राव करमजी यांनी हा किल्ला बांधला. मोगल सम्राट औरंगजेब येथे राहिला होता असे सांगतात. या किल्ल्याचे भव्य शानदार डिझाईन पाहून भारत सरकारने त्याला उत्कृष्टतेसाठीचे ग्रँड हेरिटेज अॅवॉर्ड दिले आहे. १८ व्या शतकात येथे नवीन बांधकाम केले गेले त्याला जनाना किंवा महिला विंग म्हणतात. १९४० मध्ये ओंकारसिंह यांनी स्वतःसाठी शाही विंग बांधून घेतला आहे. ११ एकर जमिनीवर या किल्ल्याचा पसारा असून बगीचे, तोफा, बंदुका येथे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत ५० जातीचे पक्षी करतात. ड्युनजवळ सूर्यास्ताचा मनोरम नजारा पाहता येतो. येथे येण्यासाठीचा उत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च असा आहे.

Leave a Comment