आशियातील सर्वात हायटेक बोगद्याला श्यामाप्रसाद मुखर्जींचे नाव


आशियातील सर्वात मोठा आणि अत्याधुनिक बोगदा अशी प्रसिद्धी असलेल्या जम्मू श्रीनगर हायवे वरील रामबन जवळच्या चिनैनी नाशरी बोगद्याला जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्तेबांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केली. जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्ग ४४ वर, १२०० मीटर उंचीवर हा १०.८९ किमी लांबीचा बोगदा असून त्यामुळे जम्मू श्रीनगर हे अंतर ४० किमीने कमी झाले आहे.

मनमोहनसिंग पंतप्रधान असतानाच्या काळात या बोगद्याचे काम सुरु झाले होते. २०१७ साली हे काम पूर्ण झाले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन करून तो राष्ट्राला समर्पित करण्यात आला होता. आशियातील हा सर्वात हायटेक बोगदा मानला जातो. दररोज शेकडो वाहने या बोगद्याच वापर करतात.

कोलकाता येथे ६ जुलै १९०१ रोजी जन्मलेल्या श्यामप्रसाद मुखर्जी यांनी १९५१ मध्ये जनसंघाची स्थापना केली. त्यांनी देशाला एक निशाण, एक विधान आणि एक प्रधान असा नारा दिला होता. काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणे आणि या राज्यासाठी लागू असलेले कलम ३७० याला प्रथमपासून त्यांचा विरोध होता. तसेच काश्मीर आणि भारताचा वेगळा ध्वज यालाही त्यांचा विरोध होता. १९५३ मध्ये परमीट मोडून त्यांनी जम्मू काश्मीर मध्ये प्रवेश केला होता तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती आणि १९५३ मध्येच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता.

चिनैनी नाशरी बोगद्याला श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देणे म्हणजे त्यांनी जम्मू काश्मीर साठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण आणि त्यांना श्रद्धांजली आहे असे नितीन गडकरी म्हणाले.

Leave a Comment