चित्रपटांच्या प्रमोशनद्वारे महसूल जमवणार रेल्वे


भारतीय रेल्वेने महसूल वाढवण्यासाठी नवी योजना तयार केली आहे. त्यानुसार, आता आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी निर्मात्यांना रेल्वेचे बुकिंग करता येणार आहे. ‘प्रमोशन ऑन व्हिल्स’ असे या योजनेला संबोधण्यात आले आहे. कला, संस्कृती, चित्रपट, टीव्ही कार्यक्रम, खेळ इत्यादींच्या प्रचारासाठी विशेष ट्रेन्स या योजनेंतर्गत जाहिरातीच्या माध्यमांतून उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. अक्षयकुमार अभिनित हाऊसफुल-४ या चित्रपटापासून याची सुरुवात करण्यात आली आहे.

पहिली विशेष ‘प्रमोशन ऑन व्हिल्स’ ही ट्रेन आयआरसीटीसी आणि पश्चिम रेल्वेद्वारे सुरु करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत हाऊसफुल-४ चित्रपटाची टीम आणि माध्यम प्रतिनिधींना घेऊन बुधवारी मुंबई सेन्ट्रल येथून निघणार असून नवी दिल्ली येथे गुरुवारी पोहोचेल. एकूण ८ डब्बे या ट्रेनमध्ये असतील, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांच्या माहितीनुसार, सूरत, वडोदरा, कोटा या महत्वाच्या जिल्ह्यांसह विविध राज्यांमधून ही विशेष रेल्वे गाडी मार्गक्रमण करणार आहे. रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत रेल्वेने ज्यांचे नवे चित्रपट येत आहेत अशा अनेक प्रॉडक्शन हाऊससोबत संपर्क देखील केला आहे. आयआरसीटीसीवर या योजनेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी देखील रेल्वेने वेळोवेळी अनेक योजनांवर आपली स्थानकं आणि गाड्यांच्या माध्यमातून महसूल वाढीसाठी काम केले आहे.

Leave a Comment