पाकिस्तान भेटीत केट मिडलटन पारंपारिक वेशभूषेत


ब्रिटीश राजघराण्याचे प्रिन्स विलियम्स आणि त्यांची पत्नी डचेस केट मिडलटन पाच दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर असून या काळात केट पाकिस्तानी पारंपारिक वेशभूषेत म्हणजे सलवार कुर्ता अशा पोशाखात दिसते आहे. या निमित्ताने तिची सासू, दिवंगत राजकुमारी डायाना हिच्या पाकिस्तान भेटीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. कारण डायाना जेव्हा जेव्हा पाक दौऱ्यावर आली तेव्हा तिने पारंपारिक सलवार कुर्ता असाच पोशाख घातला होता.

ड्युक आणि डचेस ऑफ केम्ब्रिजचे पाकिस्तानात सोमवारी जोरदार स्वागत केले गेले त्याच बरोबर सोशल मिडियावर त्याचे फोटो शेअर केले गेले. यावेळी केट, डायाना प्रमाणेच सलवार सुट मध्ये दिसली इतकेच नव्हे तर तिच्या सुटचे डिझाईन सुद्धा डायानाच्या सुट प्रमाणेच होते. ट्विटरवर ९० च्या दशकात डायानाचा पाक दौरा आणि केट मिडलटन चा हा दौरा यांची तुलना करणारे फोटो शेअर केले जात आहेत. विलियम आणि केट यांनी मंगळवारी पंतप्रधान इमरान खान याच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली तसेच एका शाळेलाही भेट दिली. १३ वर्षाच्या अंतराने ब्रिटीश राजघराण्यातील सदस्य पाक भेटीवर आले आहेत. यापूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स आणि डचेस ऑफ कॉर्नवॉल कॅमिला २००६ मध्ये पाकिस्तान भेटीवर आले होते.

पंतप्रधान इमरान खान याच्या निवास्थस्थानी शाही जोडप्याने भेट दिली तेव्हा विलियम यांनी बालपणीच्या आठवणीना उजाळा दिला. विलियम लहान असताना इमरान खान त्याच्याबरोबर क्रिकेट खेळले होते. प्रिन्सेस डायाना पाकिस्तानात लोकप्रिय होती आणि तिने अनेकदा पाकिस्तानला भेट दिली होती. इमरान खान ने सुरु केलेल्या कॅन्सर हॉस्पिटलच्या मदतीसाठी डायानाने खूप मदत मिळवून दिली होती.

Leave a Comment