उद्योगपती रतन टाटांची टॉर्क मोटर्समध्ये गुंतवणूक


देशातील प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा स्टार्टअप मध्ये गुंतवणूक करण्यासाठी नेहमीच आघाडीवर राहिलेले आहेत. इतकेच नवे तर टाटा कोणत्या नव्या स्टार्टअप मध्ये पैसा गुंतवत आहेत यावर गुंतवणूक क्षेत्राचे बारीक लक्ष असते. रतन टाटा पुण्याच्या इलेक्ट्रिक दुचाकी स्टार्टअप टॉर्क मोटर्समध्ये गुंतवणूक करत असून येत्या काही महिन्यात या कंपनीची पहिली इलेक्ट्रिक बाईक टी ६ एक्स भारतीय बाजारात आणली जात आहे.

रतन टाटा यांनी स्वतःच या गुंतवणुकीबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, गेल्या काही वर्षात इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहण्याच्या लोकांच्या दृष्टीकोनात खूप मोठा बदल झाला आहे. हा बदल अतिशय वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. रतन टाटा टॉर्क मोटर्सच्या कामगिरीने प्रभावित झाले आहेत त्यामुळे त्यांनी या कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.

टॉर्क मोटर्सच्या पहिल्या वाहिल्या ई बाईक टी ६ एक्सला लिथियम आयन बॅटरी दिली गेली आहे. सिंगल चार्जवर ही बाईक १०० किमी अंतर कापेल आणि तिचा टॉप स्पीड ताशी १०० किमी आहे. एका तासात या बाईकची बॅटरी ८० टक्के चार्ज होते. देशातील ही पहिली ई बाईक कंपनी असून त्यांनी त्यांची बाईक देशात सर्वप्रथम लाँच करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्या अगोदरच रीव्होल्टने त्यांची ई बाईक लाँच केल्याने ते शक्य झाले नाही.

Leave a Comment