बीसीसीआयचा नवा अध्यक्ष एवढ्या संपत्तीचा आहे मालक


नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ म्हणून ओळखला जाणारा गांगुली संपत्तीच्या बाबतीतही ‘दादा’ आहे. 354 कोटींची संपत्ती सौरव गांगुलीकडे असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर ‘बंगाल क्रिकेट असोसिएशन’च्या अध्यक्षपदी असलेल्या गांगुलीला कॉमेंट्री सोडावी लागणार आहे. त्याचप्रमाणे त्याच्यावर व्यावसायिक जाहिराती करण्यावर बंधन येणार आहे. सुखवस्तू कुटुंबातून आलेल्या गांगुलीने तब्बल 354 कोटींची संपत्ती जमवल्याची चर्चा आहे.

कोलकात्यामध्ये गांगुलीच्या नावे आलिशान बंगला आहे. डझनभर खोल्या या बंगल्यात आहेत. सात कोटी रुपयांच्या घरात या बंगल्याची किंमत आहे. याशिवाय सौरव गांगुलीच्या नावे 45 कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचे म्हटले जाते. महागड्या गाड्यांचाही सौरव गांगुलीला शौक आहे. त्याच्या ताफ्यात ऑडी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज बेंज यासारख्या आलिशान गाड्या आहेत. या गाड्यांची किंमतही सात कोटींच्या आसपास आहे.

सौरव गांगुली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर समालोचनाकडे वळला. तो आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाशीही निगडीत आहे. तो स्पोर्ट्स चॅनलवर कॉमेंट्रीचे सात कोटी रुपये घेत असल्याचे म्हटले जाते. बीसीसीआयच्या ए प्लस कॅटेगरीतील खेळाडूंनाही एवढे मानधन मिळत नाही.

गांगुली व्यावसायिक जाहिरातींसाठीही तगडे मानधन घेत असल्याची चर्चा आहे. तर गांगुलीला ब्रँड एंडॉर्समेंटसाठी दोन ते तीन कोटी रुपये मोजावे लागतात. तो इंडियन सुपर लीगच्या ‘एटलॅटिको द कोलकाता’ टीमचा सहमालक आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद आणि भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवल्यामुळे गांगुलीकडे मैदानासोबतच प्रशासनातील अनुभवही गाठीशी आहे.

Leave a Comment