लातूरच्या लेकाला पहिले राफेल उडवण्याचा मान


मुंबई : आणखी एक मानाचा तुरा महाराष्ट्रासह मराठवाडयाच्या शिरपेचात रोवला गेला आहे. लातूरच्या मराठमोळ्या पठ्ठ्याला पहिले राफेल विमान उडवण्याचा मान मिळाला आहे. उदगीरचे स्क्वॉड्रन लीडर सौरभ अंबुरे यांनी ऐतिहासिक गगनभरारी घेतली.

फ्रान्समध्ये राफेल विमानातून सौरभ अंबुरे यांनी गगनभरारी घेत पहिले राफेल विमान उडवले. याबाबतची माहिती देताना वायुसेनेने फोटो शेअर केला असून यामध्ये सौरभ अंबुरे राफेल विमानासोबत दिसत आहेत. राफेल हवाई दलाच्या ताफ्यात सहभागी झाल्याने भारताची ताकद आणखीन वाढली आहे.

पहिले राफेल विमान दसऱ्याच्या मुहूर्तावर भारताच्या ताब्यात मिळाले. जुलै महिन्यातच शत्रूला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये बसून अंबुरे यांनी पहिल्यांदा झेप घेतली होती. भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या युद्धाभ्यासावेळी लढाऊ विमान अंबुरे यांनी उडवले. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत RB 001 राफेल (Rafale combat jet) हे विमान फ्रान्सने भारताला सोपवले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये या विमानातून पहिली भरारी घेतली.