1 डिसेंबरपासून लागू होणार ‘एक देश एक फास्टॅग’

रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी इंडियन मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात ‘वन नेशन वन फास्टॅग’ योजनेची सुरूवात केली. ही योजना 1 डिसेंबर 2019 पासून देशभरात लागू होईल. ही योजना लागू झाल्यानंतर वाहन विना रक्कम भरता देशभरात कोठेही प्रवास करू शकेल. कॅशलेस सिस्टमचा वापर वाढावा यासाठी सरकार अनेक योजना आणत आहे.

‘एक देश एक फास्टॅग’वर बोलताना नितिन गडकरी यांनी सांगितले की, सध्या देशातील महामार्गावर एकूण 527 टोल नाके आहेत. ज्यातील 380 टोल नाक्यावरील सर्व लेन फास्टॅगशी जोडल्या गेल्या आहेत. फास्टॅग लागू झाल्यावर टोल नाक्यावर गर्दी होणार नाही व यामुळे वेळ वाचेल.

फास्टॅग केवायसीसाठी ओळखपत्र जसे की, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स देऊन तुम्ही फास्टॅग अकाउंट उघडू शकता. यासाठी पासपोर्ट साइज फोटो देखील गरजेचा आहे. फास्टॅग सर्व टोल नाके आणि काही बँकेतून ऑनलाईन खरेदी करता येईल. वन टाइम टॅग डिपॉजिट करून फास्टॅग घेऊ शकता. कार, व्हॅन, जीपसाठी 200 रूपये आणि ट्रक, ट्रॅक्टरसाठी 500 रूपये शुल्क आहे.

असे करा रिचार्ज –

फास्टॅगला रिचार्ज करण्यासाठी तुम्ही डेबिट-क्रेडिट कार्ड, आरटीजीएस आणि नेट बँकिंगचा वापर करू शकता. फास्टॅग खात्यात तुम्ही 100 रूपयांपासून ते 1 लाख रूपये ठेऊ शकता.

असे काम करते –

फास्टॅग हे वाहनाच्या विंडस्क्रीनवर लावले जाते. यामध्ये रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफिकेशन लावलेले असते. तुम्ही टोल नाक्यावर पोहचताच सेंसर हे फास्टॅग स्कॅन करते आणि तुमच्या अकाउंटमधील पैसे कापले जातात. याद्वारे होणाऱ्या काही अडचणी देखील समोर आल्या होत्या, मात्र या अडचणी दूर करण्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार असल्याचे अथॉरिटीकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment