म्हणून हा जेष्ठ नागरिक चोरत होता सायकल सीट्स


जपानमध्ये एका ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांनी चोरीच्या आरोपावरून अटक केली आहे. विशेष म्हणजे तो व्यावसायिक चोर नाही तर एक सज्जन नागरिक आहे. चोरीमुळे त्याला जो त्रास झाला होता त्याचा बदला घेण्यासाठी या चोऱ्या केल्याचे त्याचे म्हणणे आहे. टोक्योजवळच्या ओटावार्ड भागातून अकियो हातोरी नावाच्या या माणसाने एक दोन नव्हे तर तब्बल १५९ सायकल सीट चोरून नेल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार अकोरी यांच्या सायकलची सीट अशीच कुणा चोराने प्रथम चोरली आणि नंतर त्यांची सायकलही चोरीला गेली. सायकल चोरी झाल्याचा अकीरो यांना खूप त्रास झाला. त्यांना नवीन सायकल आणि नवी सीट खरेदी करावी लागली. पण पोलिसांत तक्रार देण्याऐवजी सायकल सीट आणि सायकल चोरीचे दुःख लोकांना कळावे म्हणून त्यांनी त्यांना झालेल्या त्रासाचा बदला घेण्यासाठी स्वतः लोकांच्या सायकल सीट चोरण्याचा निर्णय घेतला आणि १५९ सायकल सीट चोरल्या.

ओटावार्ड भागातून पोलिसांकडे गेले काही दिवस सातत्याने सायकल सीट चोरीला जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. तेव्हा पोलिसांनी या भागात लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले तेव्हा एक माणूस आरामात सायकल सीट चोरून स्वतःच्या सायकलला लावलेल्या बास्केट मध्ये टाकून जात असलेला सापडला. पोलिसांनी त्याची ओळख पटवून त्याच्या घरावर धाड टाकली तेव्हा तेथे १५९ सीट सापडल्या. पोलिसांनी त्याला अटक केल्यावर या चोरीमागाचे कारण त्याने सांगितले तेव्हा पोलिसांना हसावे की रागवावे असा प्रश्न पडला. पोलिसांनी जपानी मिडियाला या चोरी झालेल्या सायकल सीटसचे फोटो दिले आणि मिडियाने ते छापले तेव्हा या चोरीची चर्चा सुरु झाली.

Leave a Comment