आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर


मुंबई : अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीच्या रडारवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल आले आहेत. दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मेमन मिर्ची याच्या कुटुंबाशी पटेल यांच्या कुटुंबाशी निगडीत कंपनीने जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप आहे.

‘मिर्ची’च्या कुटुंबाशी प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबाशी निगडीत ‘मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप होत आहे. मुंबईत वरळी भागात असलेल्या नेहरु प्लॅनेटोरियमजवळ मोक्याची जागा होती. मिर्चीच्या कुटुंबाकडून हा प्लॉट पटेल यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या ‘मिलेनियम डेव्हलपर्स’ कंपनीला देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी ईडी अधिक चौकशी करत आहे.

‘मिलेनियम डेव्हलपर्स’ने या प्लॉटवर पंधरा मजली ‘सीजे हाऊस’ ही इमारत बांधली. ही व्यावसायिक आणि रहिवासी इमारत आहे. ईडीने हे दावे गेले दोन आठवडे मुंबई आणि बंगळुरुमध्ये केलेल्या छापेमारीत मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे केले आहेत. ईडीने या प्रकरणी 18 जणांचा जबाब घेतला आहे. त्याचबरोबर ईडीने डिजिटल पुरावे, ईमेल आणि कागदपत्रेही सील केली आहेत.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा इकबाल मेमन मिर्ची हा निकटवर्तीय मानला जातो. त्याची पत्नी हजरा मेनन हिच्या नावे वरळीत एक प्लॉट आहे. ईडीला सापडलेल्या कागदपत्रांमध्ये प्लॉटच्या पुनर्विकासासाठी हजरा आणि मिलेनियम डेव्हलपर्समध्ये झालेल्या या कराराचा समावेश आहे.

हा करार 2006-07 या कालावधीमध्ये झाला होता. सीजे हाऊसमधील दोन मजले 2007 मध्ये मेमन कुटुंबाला हस्तांतरित केल्याचाही यामध्ये उल्लेख आहे. 14 हजार चौरस फूटावर बांधलेल्या या दोन मजल्यांची किंमत दोनशे कोटी रुपयांच्या घरात असल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितले. मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये प्रफुल्ल पटेल आणि त्यांची पत्नी भागीदार असल्यामुळे ईडीकडून पटेल कुटुंबाला स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावणे येऊ शकते, असेही म्हटले जात आहे.

Leave a Comment