एअर इंडियाच्या १२० वैमानिकांचा तडकाफडकी राजीनामा


नवी दिल्ली : अर्थिक संकटात सापडलेल्या एअर इंडियासमोर नवे संकट उभे राहिले असून कंपनीच्या 120 वैमानिकांनी वारंवार मागणी करुनही पगार आणि पदोन्नती न मिळाल्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. हे सर्व एअरबस ए- ३२० चे वैमानिक आहेत.

केंद्र सरकारचे एअर इंडियावर कंपनीवर ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज असताना वैमानिकांनी राजीनामा दिला आहे. एकाच वेळी 120 वैमानिकांनी राजीनामा दिल्याने कंपनी मोठ्या संकटात सापडली आहे. राजीनामा देणाऱ्या वैमानिकाने एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, आमच्या मागण्यांकडे व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले. वेतनवाढ आणि पदोन्नती या दोनच मागण्या होत्या. आम्ही हे पाऊल या वारंवार मागणी करुनही पूर्ण न झाल्याने उचलले आहे.

वैमानिकांशी कंपनीकडून पाच वर्षाचा करार करण्यात येतो. वैमानिकांना करारानुसार कमी पगारावर ठेवण्यात येते. पाच वर्षात वेतन वाढ होईल किंवा पदोन्नती मिळेल अशी आमची अपेक्षा होती परंतु ती आम्हाला मिळाली नाही. तसेच वेळेवर पगारही होत नाही. या विषयी व्यवस्थापनाकडे अनेकदा तक्रार देखील केली पण याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आम्ही हा निर्णय व्यवस्थापनाच्या या ढिसाळ कारभाराला कंटाळून घेतला असल्याचे वैमानिकाने सांगितले.

विमानांच्या फेऱ्यावर सामूहिक राजीनाम्यानंतर कोणताही फरक पडणार नाही. एअर इंडियाकडे सध्या 2000 वैमानिक असून त्यातील 400 वरिष्ठ वैमानिक असल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. आगामी काळात इंडिगो एअर, गो एअर, विस्तारा आणि एअर आशिया या विमान कंपन्यामध्ये एअरबस ए- ३२० साठी भरती होणार असल्यामुळे राजीनामा दिलेल्या वैमानिकांना अनेक संधी उपलब्ध आहेत.

Leave a Comment