बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर सौरव गांगुली


भारतीय क्रिकेटविश्वात प्रिन्स ऑफ कोलकाता म्हणून प्रसिद्ध असलेला, टीम इंडियाचा माजी कप्तान दादा उर्फ सौरव गांगुली बीसीसीआयचा नवा अध्यक्ष बनणार यावर आता शिक्कामोर्तब झाले असून नाट्यपूर्ण घडामोडींनंतर सौरवची निवड करण्यात आल्याचे समजते. रविवारी मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बीसीसीआयची औपचारिक बैठक पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. सौरव आजच नामांकन भरणार असून २३ ऑक्टोबरल होण्यारया वार्षिक सभेचे आयोजन केले जाणार नसल्याचेही समजते.

रविवारच्या बैठकीत नवीन अध्यक्ष कोण याच्या नावावरून काही काळ नाट्य रंगले. सदस्य माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि श्रीनिवासन असे दोन गटात विभागले गेले होते. त्या दोघांना त्यांचाच उमेदवार अध्यक्ष व्हावा असे वाटत होते मात्र अखेर सौरवची अध्यक्ष म्हणून वर्णी लागली. कर्नाटकच्या ब्रिजेश पटेल याना आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष निवडले गेले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय याची सचिवपदी तर अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुणसिंह यांची कोषाध्यक्ष म्हणून वर्णी लागेल असे समजते.

बीसीसीआयच्या अपेक्स कौन्सिलमध्ये नऊ सदस्य असतात. टीम इंडियाचा माजी फलंदाज अंशुमन गायकवाड यांनी ४७१ मते मिळवून कीर्ती आझाद यांचा पराभव केल्यामुळे त्यांची क्रिकेट असोसिएशनचे पुरुष प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे तर महीला क्रिकेटच्या माजी कप्तान शांता रंगास्वामी यांची महिला प्रतिनिधी म्हणून निवड झाली. माजी क्रिकेटपटू सुरिंदर खन्ना कौन्सिलमध्ये आयपीएल जीसी प्रतिनिधी असतील.

दरम्यान आयसीसी मध्ये बीसीसीआयचा प्रतिनिधी कोण असेल यावर अद्याप निर्णय झालेला नही. पुढच्या महिन्यात हा निर्णय घेतला जाणार आहे असे समजते.

Leave a Comment