अबब ! या सँडल्सची किंमत १४१ कोटी


पायात घालायचे जोडे, चपला, बूट, सँडल्स यांची किंमत असून असून किती असेल असे जर तुम्हाला वाटत असले तर तुमची कल्पना शक्ती फार तोकडी आहे असे खुशाल समजा. दुबईच्या मरीना मध्ये नुकतेच एका सँडल्स जोडीचे प्रेझेंटेशन झाले. शुक्रवारी एका अलिशान लग्झुरीयस याट वर या सँडल्सचे अनावरण झाले आणि त्याने त्वरित गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविले. या मौल्यवान सँडल्सची किंमत आहे १.९९ कोटी डॉलर्स म्हणजे १४१.३३ कोटी रुपये. आता बोला!

यापूर्वी असे महागडे जोडे सादर केले गेले आहेत. यापूर्वीच्या सर्वाधिक महाग जोड्याची किंमत ११० कोटी रुपये होती. किमतीचे नवे रेकॉर्ड नोंदविलेल्या सँडल्सचे नामकरण ‘द मून स्टार’ असे केले गेले असून त्यात ३० कॅरेटचे छोटेछोटे हिरे जडविले गेले आहेत. तसेच १५७६ मध्ये अर्जेंटिनामध्ये पडलेल्या एका उल्कापिंडाचे तुकडे त्यावर जडविले गेले आहेत. इटलीचा प्रसिद्ध डिझायनर एन्तोनीओ वीएन्नी याने हे जोडे बनविले आहेत. त्याने यापूर्वीही म्हणजे २०१७ मध्ये २४ कॅरेट सोन्याचे जोडे बनविले होते त्यावेळी त्याची किंमत २३ लाख होती.

गिनीज रेकॉर्ड नोंदविलेले द मून स्टार जोडे बनविताना आपण कोणतेतरी रेकॉर्ड बनवावे असे या डिझायनरच्या मनातही नव्हते किंवा त्याचा तो हेतूही नव्हता. एन्तोनीओ म्हणतो, त्याच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नाही. म्हणजे त्यात सारे आलेच. नाही का?

Leave a Comment