मेजवानीच्या निमित्ताने…


काळ बदलत गेला तसं आपलं social life देखील बदलत गेलं . विशेष कार्यक्रमांच्या प्रसंगी नातेवाईकां कडे किंवा स्नेही मंडळींकडे मेजवानी ची आमंत्रणं असतात ,पण असे कार्यक्रम अगदी अनौपचारीक असतात . या घरगुती समारंभांबरोबरच आताशा नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने औपचारिक मेजवान्यांसाठी जायचे प्रसंग वरचेवर येत असतात . अश्या प्रसंगी भेटणारे लोक कित्येकदा निरनिराळ्या प्रान्तांतलें ,विविध संस्कृतींमधून आलेले असतात . प्रत्येकाची खाद्य संस्कृती वेगळी ,पद्धतीही निराळ्या. त्या मुळे अश्या मिश्रसंस्कृतींतून आलेल्या मंडळींना घरी जेवायला बोलावताना किंवा त्यांच्या कडे मेजवानीला जाताना काही गोष्टी विचारात घेतल्या तर यजमान आणि आमंत्रित पाहुणे मंडळी यांच्यासाठी हा समारंभ सुखावह ठरतो .

मेजवानी साठी बोलावताना :
१. घरगुती मेजवानी करता आमंत्रण करायच झाल्यास फोनवरूनच आमंत्रण देण्याची पद्धत सर्वमान्य आहे. पण औपचारिक मेजवानी साठी बोलावताना औपचारिक इन्व्हिटेशन देणं चांगलं. त्यामध्ये कार्यक्रमाची तारीख,वेळ,कार्यक्रम कशासाठी आयोजित केला गेला आहे (म्हणजे नवीन घर घेतल्याच्या निमित्ताने ,किंवा लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा आणखी इतर कशानिमित्त),याचा उल्लेख जरूर करावा. त्याच बरोबर आमंत्रण कॉकटेल्ससाठी ,लंच किंवा डिनर साठीचं आहे याचा उल्लेख करावा. कार्यक्रम जास्त उशिरा पर्यंत चालत राहू नये यासाठी वेळेचा उल्लेखही असावा.(उदा. संध्याकाळी ७.३० – १०.३०). इन्व्हिटेशन अगदी छापील असायला हवं असं नाही. इ -इन्व्हिटेशन सुद्धा पाठवता येईल. अशा इन्व्हिटेशन मुळे पार्टी ला पर्सनल टच येतो .

२. मेजवानीसाठी बोलावताना येणारी पाहुणे मंडळी एकमेकांना ओळखणारी असली तर मेजवानीत होणाऱ्या गप्पांना आपोआप रंग चढत जातो. पाहुणे मंडळी जर एकमेकांसाठी अनोळखी असतील तर त्यांची परस्परांशी ओळख करून देणं अगत्याचं ठरतं. एखाद्या कार्यक्रमाला जाऊन अगदी कुणीसुद्धा ओळखीचं नसल्यावर येणारा अवघडपणा आपण सगळ्यांनीच कधी ना कधी अनुभवलेला आहे. त्यामुळे आपल्या कडे आलेल्या पाहुण्यांना असा अवघडपणा वाटू नये याची काळजी घ्यावी.

३. घरी मेजवानी म्हटलं की निरनिराळे खाद्यपदार्थ करणं तर आलंच, पण त्या शिवाय अजूनही बरीच तयारी करावी लागते.पाहुण्यांसाठी बैठकीची व्यवस्था,बुफे टेबलची थोडीफार सजावट, प्लेट्स,ग्लासेस,कटलरीची मांडणी,हवामानानुसार अतिरिक्त कूलर्स,पंखे वगैरेंची सोय शक्यतो एक दिवस आधी करावी. त्यामुळे मेजवानीच्या दिवशी जेवणाची तयारी करण्यासाठी वेळ मिळतो. जेवण किंवा स्नॅक्स जरी बाहेरून आयते येणार असले तरी ते सर्व्ह आपल्यालाच करायचे असतात. तशी तयारी आधीच करून ठेवलेली कधीही सोयीची असते.

४. आपण सर्व्ह करत असलेले स्नॅक्स चटकन उचलून खाता येण्याजोगे असावेत. स्नॅक्सबरोबर हात पुसण्यासाठी पेपर नॅपकिन्स,किंवा टिक्का इत्यादी स्नॅक्स उचलून खाण्यासाठी टूथपिक्स जरूर ठेवलेल्या असाव्यात. वापरलेल्या टूथपिक्स टाकण्याकरता एखादा बाउल ठेवलेला असावा.कॉकटेल सर्व्ह करताना वापरल्या जाणाऱ्या ग्लासेसची काळजीपूर्वक निवड करावी. कुठल्या प्रकारची पेय कुठल्या प्रकारच्या ग्लासेसमधे दिली जात आहेत याकडे योग्य लक्ष पुरवावे.

५. आपलं घर नीटनेटकं असावं. ज्या रूम्समधे पाहुण्यांची ये-जा टाळायची असेल,त्या रूम्स आधीच बंद करून ठेवाव्यात. पाहुणे मंडळींसाठी वापरायच्या वॉशरूम कडे विशेष लक्ष द्यावं. वॉशरूममध्ये स्वच्छ नॅपकिन्स,लिक्विड सोप किंवा सोप बार,एखादी सेन्टेड कॅण्डल असावी.वॉशरूमधे शक्यतो मासिकं ,पुस्तकं ठेवण्याचं टाळावं. सेन्टेड कॅण्डल्स,एखादी लहानशी पुष्परचना एक आगळाच अँबियन्स देते.

६. येणाऱ्या पाहुण्यांसोबत जर मुलंही असतील,तर त्यांच्यासाठी एका स्वतंत्र रूममध्ये खेळण्याची,मनोरंजनाची व्यवस्था केली तर मुलं ना कंटाळता अगदी मजेत राहतात.त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीच्या स्नॅक्सची व्यवस्था त्या ररूममधेच करून ठेवावी. मुलांकडे वेळोवेळी लक्ष देऊन त्यांना काय हवं -नको ते बघावं.

७. पाहुण्यांना निरोप देताना एखादी छोटीशी भेटवस्तू शक्यतो द्यावी.वस्तू जितकी पेर्सनालिज्ड असेल तितकं जास्त चांगलं -म्हणजे आपण स्वतः तयार केलेली एखादी वस्तू,किंवा आपला आणि त्या पाहुण्यांचा काही निमित्ताने एकत्र काढलेला एक सुरेखसा फोटो अश्या भेटवस्तू दीर्घकाळ आठवणीत राहतात.

पार्टीला जाताना :

१. आपल्याला आलेलं आमंत्रण काळजीपूर्वक वाचून त्यामध्ये दिलेली तारीख,वेळ आपल्या डेली प्लॅनर मध्ये नोंदवून ठेवावी,त्यामुळे समारंभाचा विसर पडणार नाही. ज्या निमित्ताने आमंत्रण आला आहे त्या निमित्ताला साजेलशी भेटवस्तू आधीच आणून ठेवावी. भेट म्हणून पर्फ्युम किंवा कॉस्मेटिकस देण्याचे शक्यतो टाळावे कारण त्या बाबतीतल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी वैयक्तिक असतात.

२. कार्यक्रमासाठी दिलेल्या वेळेनुसार जाणं चांगला,पण काही कारणांनी उशीर होत असल्यास त्याची आगाऊ कल्पना यजमानांना द्यावी. वेळेची मर्यादा असेल तर ती लक्षात घेऊन यजमानांचा निरोप घ्यावा.

३. आपल्या सोबत लहान मुलं असतील तर वेट वाईप्स,सॅनिटायझर,थोडासा खाऊ,पाणी वगैरे वस्तू सोबत ठेवाव्यात. मोठी मुलं असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवावं. कधी मुलांची आपापसातली भांडणं,कधी चुकून होणारे लहान-मोठे अपघात या मुळे टाळले जाऊ शकतात.

४. एक चांगला “गेस्ट” नेहमीच यजमानांच्या मदतीला तत्पर असतो, पण त्याहीपेक्षा एक चांगला “होस्ट ” आपल्या पाहुण्यांची सरबराई तत्परतेने करत असतो. आपल्या यजमानांनी कार्यक्रमकरता खूप परिश्रम घेतलेले असतात हे लक्षात ठेऊन कुठल्याही प्रकारची टीका करणे टाळावे.

या आणि अशा कितीतरी लहानलहान गोष्टींची काळजी आपण घेतली, तर प्रत्येक मेजवानी हि यजमानसाठी आणि बोलावलेल्या पाहुणे मंडळींसाठी एक छान अनुभव म्हणून सिद्ध होते.

Leave a Comment