शेतीसाठी विकली सॉफ्टवेअर कंपनी


भारतातील तरूण हा शेती व्यवसायात घ्यावी लागणारी अपार मेहनत यामुळे शेती व्यवसायाकडे वळताना फारच कमी दिसतो. शिक्षणानंतरही बोटावर मोजण्या इतकी तरूण मंडळी शेती व्यवसाय करण्याचा मार्ग अवलंबतात. मात्र, देशातील तरूणाईसमोर एक मोठा आदर्श गोव्यातील एका तरूणाने उभा केला आहे. गोव्यातील इंजिनिअर या तरूणाचे नाव अजय नाईक असे असून त्याने शेती करता यावी म्हणून स्वत:ची सॉफ्टवेअर कंपनी विकली आहे.

ग्रामीण भागातील तरूण शिक्षणासाठी शहरात जातात पण पुन्हा गावाकडे जातच नसल्यामुळे शेती तशीच पडीक राहते. तर त्यातून मिळणारे उत्पन्नही शाश्वत नसते असा समज या तरूणांचा होत असल्यामुळे ते शेतीऎवजी नोकरीला प्राधान्य देतात. पण जर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती व्यवसाय केला तर त्यातूनही मोठा फायदा होऊ शकतो हे गोव्यातील तरूणाने सिद्ध केले आहे. अजयने चांगले पैसे मिळवून देणारी त्याची सॉफ्टवेअर कंपनी त्याने विकली आणि शेती करायला लागला.

गोव्यात राहणारा ३२ वर्षाचा सॉफ्टवेअर इंजिनिअर अजय नाईक यांची स्वत:ची सॉफ्टवेअर कंपनी होती. पण इंजिनिअर म्हणून आपले करिअर घडवण्यापेक्षा त्याने एक प्रगतीशील शेतकरी होण्यास प्राधान्य दिले. रसायने फवारलेली फळ आणि भाज्या खाण्यापेक्षा लोकांना आरोग्यदायी भाज्या खायला मिळाव्यात यासाठी त्याने हाइड्रोपोनिक शेती करण्याचे ठरवले. त्याने ‘द बेटर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत हे गोव्यातील पहिले हाइड्रोपोनिक शेत असल्याचे सांगितले. सहा जणांच्या मदतीने अजय ऑर्गेनिक भाज्या आणि फळे पिकवतो. पाण्याचा पुरेपुर वापर आणि कोणत्याही हानिकारक रसायनांचा वापर न करता अजय आपल्या शेतामध्ये भाजीपाला पिकवतो. अनेक सुपरमार्केटमध्ये त्यांच्या उत्पादनाला मोठी मागणी आहे. यावर्षी त्याने आपली कंपनी विकली होती. यातून मिळालेल्या पैशातून त्याने छोटे हाइड्रोपोनिक फार्म उभारले.

Leave a Comment