यूट्यूबच्या साहायाने रिक्षाचालकाच्या मुलाने तयार केली अनोखी कार

car
मुंबई – आपली इच्छाशक्ती जर मजबूत असेल तर कोणतीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही. कोणत्याही परिस्थितीत आपले स्वप्न साकार करता येते. अशीच एक प्रोत्साहन देणारी घटना मुंबईत घडली आहे. एका १९ वर्षीय मुलाने काहीतरी वेगळ करण्याच्या ध्येयातून एका अनोख्या कारची निर्मिती केली आहे. त्याने ही कार भंगार मधून मिळवली, यूट्यूबवर काही व्हिडिओ पाहिले आणि कार अॅसेंबल केली.

त्याने ही कार एका जुन्या गाडीच्या इंजिनाचा आणि अनेक जुन्या पार्ट्सचा वापर करून तयार केली असून या मुलाचे नाव प्रेम ठाकूर असे असून हा मुलगा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. त्याचा हा कारनामा यूट्यूबवरील VideoVolunteers नावाच्या चॅनलने जगासमोर आणला. चार महिन्यांपर्यंत कारच्या चासीच्या वेल्डिंगचे काम पूर्ण करून रंगाचे कामदेखील स्वतःच केल्याची माहिती त्याने या व्हिडिओमध्ये दिली आहे. प्रेमचे वडील रिक्षाचालक असून कार निर्मितीचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता.

तरीही काहीतरी अ‍ॅडजस्टमेंट करून प्रेमने अडीच लाख रुपये खर्चून आपले कार निर्मितीचे स्वप्न साकारले. कुटुंबियांची आणि इंटरनेटची साथ नसती तर आपण ही कार निर्माण करू शकलो नसतो अशी भावना प्रेमने व्यक्त केली. प्रेमच्या मनात आता ऑटोमोबाईल इंजिनियर बनण्याची इच्छादेखील निर्माण झाली आहे.

Leave a Comment