मानसिक स्वास्थ्यावर उतारा; पाळीव प्राणी

dog
तुम्हाला मानसिक अस्वास्थ्य जाणवत असेल तर त्यासाठी कोणत्याही मानसशास्त्रज्ञाकडे समुपदेशनासाठी जाण्याची गरज नाही आणि मानसरोगतज्ञ डॉक्टरकडून कसली औषधेही घेण्याची गरज नाही. तुम्ही एखादा कुत्रा किंवा मांजर पाळले असेल तर हे पाळीव प्राणीच तुमचे मानसिक अस्वास्थ्य दूर पळवू शकतील. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका पाहणीमध्ये असा निष्कर्ष हाती आलेला आहे. या संबंधात करण्यात आलेल्या पाहणीमध्ये सहभागी झालेल्या लोकांनी, आपल्या मानसिक आजारावर कुत्रा किंवा मांजरासारखे पाळीव प्राणी केवळ आपल्या अस्तित्वाने उपाय ठरू शकतात असे म्हटले आहे.

ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर या विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हेलेन ब्रुक्स यांनी या संबंधात संशोधन केले असून पाळीव प्राण्यामध्ये आपल्या विचार करण्याच्या पध्दतीत बदल घडवण्याची क्षमता असते असे म्हटले आहे. विशेषतः व्यक्ती जेव्हा एखाद्या पेचप्रसंगातून वाटचाल करत असते तेव्हा त्या वाटचालीत कुत्र्याचे केवळ अस्तित्व माणसाला स्वास्थ्य मिळवून देते. आपल्या सभोवती अशा पेचप्रसंगात काही लोक आपल्याला सल्ले देत असतात. मात्र हे सल्ले देत असताना असे लोक निरनिराळ्या मानसिक पातळीवरून बोलत असतात. कुत्र्याचे तसे नसते.

आपला धनी नाराज आहे हे कुत्र्याला आपोआप समजते आणि ते अशावेळी आपल्या मालकापासून दूर जात नाही. त्याची आपल्या मालकावर निस्सीम भक्ती, अढळ प्रेम आणि पराकोटीचा आदर असतो. त्याच्या या निष्ठा अबाधित असतात आणि या निष्ठेचे प्रतिबिंब नकळतपणे त्यांच्या वागण्यात पडत असते. तेच त्याच्या मालकाला आश्‍वासक वाटते आणि त्याच्या मनाला दिलासा मिळतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment