भरपेट जेवणाला उतारा

food
रात्रीचे जेवण हे मर्यादितच असले पाहिजे असा आरोग्याचा साधा नियम आहे. परंतु चार मित्र-मैत्रिणी जमल्या, हवा चांगली असली आणि मूड मस्त असला की आडवा हात मारावासाच वाटतो. प्रेमाचे आणि जवळचे कोणीतरी आग्रह करणारे असले की आणखीन चार घास जास्त खाल्ले जातात. मग पोट बिघडते आणि नकळतपणे काही विषारी द्रव्यांची निर्मिती जठरांमध्ये व्हायला लागते. जास्तीच्या जेवणाची ही हानी भरून काढायची असेल तर काही सोपे इलाज तज्ञांकडून सूचित केले जातात. ते सोपे, घरगुती आणि सहज उपलब्ध असणारे आहेत. रात्री भरपूर जेवण झाले असेल तर सकाळी भरपूर पाणी प्या. रात्रीच्या जेवणाने झालेले नुकसान भरून निघेल. महात्मा गांधी अनेक वेळा हा प्रयोग करत असत. अन्न न खाता काही वेळ केवळ पाण्यावर राहणे हा एक चांगला निसर्गोपचार आहे. असे त्यांचे अनुभवाअंती झालेले मत होते.

रात्रीच्या भरपूर जेवणावर एक सहजसाध्य आणि सोपा उपाय म्हणजे ग्रीन टी. सकाळी ग्रीन टी प्यायल्याने पोटाला झालेला त्रास कमी होतो आणि त्यातून निर्माण झालेले विषारी द्रव्य पचनसंस्थेच्या बाहेर फेकले जाते. शहाळ्याचे पाणी हाही एक असाच सोपा आणि आपल्या आवाक्यातला उपाय आहे. नारळाच्या पाण्याने पचनसंस्थेचे शुध्दीकरण तर होतेच पण त्याच्या मार्फत शरीराला इतरही अनेक पोषणद्रव्ये प्राप्त होतात. नारळाचे पाणी हे अनेक प्रकारच्या पोषणद्रव्यांचा स्रोत आहे. लहान सहान आजारातून उठल्यानंतर जाणवणारा अशक्तपणा घालवण्यासाठी तर नारळाचे पाणी फारच उपायुक्त ठरते.

भरपूर पाण्याचा अंश असलेली फळे हाही एक तडस लागलेल्या पोटावरचा इलाज आहे. ज्यामध्ये टरबूज, स्ट्रॉबेरीज आणि पायनॅपल यांचा समावेश आहे. त्यांच्यामुळे पचनसंस्था तर शुध्द होतेच पण त्यांच्यात पाण्याचा अंश भरपूर असल्यामुळे शरीरामध्ये नकळतपणे होणारे डिहायड्रेशन भरून निघते. अशा प्रकारच्या भरपेट जेवणाच्या रात्रीनंतरच्या सकाळी अंडी खावीत. त्यांचाही चांगला परिणाम होतो असा तज्ञांचा दावा आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment