पाठीचा कणा ताठ ठेवा


पाठीचा कणा हा आपल्या शरीरातला फार महत्त्वाचा अवयव आहे. म्हणूनच एखाद्या संस्थेचे वर्णन करतानासुध्दा ती संस्था ज्या व्यक्तीच्या आधारावर उभी असते तिला त्या संस्थेचा पाठीचा कणा असे म्हणतात. पाठीच्या कण्याच्या आजार फार गंभीर समजला जातो. मात्र त्या कण्याला कसलीही इजा होऊ नये यासाठी पाळावयाची पथ्ये मात्र फार सोपी असतात. ती पथ्ये पाळली की पाठीच्या कण्याचा कसला त्रास होत नाही. पहिले पथ्य म्हणजे झोपताना व्यवस्थित झोपा झोपल्यानंतर डोक्यापासून पायाच्या टाचेपर्यंत सगळे अवयव गादीला लागतात. ते लागत असताना सगळ्या अवयवांवर समान दबाव पडावा याची दक्षता घेतली पाहिजे. काही वेळा डोकेच उंच राहते तर काही वेळा केवळ खांद्यावर जास्त भार पडतो. असा असमतोल होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे.

पाठ आणि पोट या दोन्हींचेही स्नायू मजबूत नसतील तर पाठीचे दुखणे मागे लागते आणि तसे ते मजबूत व्हावेत यासाठी काही विशिष्ट्य व्यायाम तज्ञांच्या सल्ल्याने केले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण वापरतो ती पादत्राणे योग्य असली पाहिजेत. काही वेळा काही महिला उंच टाचांची पादत्राणे वापरतात. त्या टाचांच्या उंचीबाबत अतिरेक केल्यास पाठीच्या दुखण्याचे त्रास सुरू होऊ शकतात. तेव्हा पाठीवर, कंबरेवर, मांड्यावर आणि खांद्यावर अतिरिक्त दबाव न पडेल एवढ्याच उंचीच्या टाचांची चप्पल किंवा सँडल वापरले पाहिजे. उंच टाचांच्या चपलांची निवड करताना ती घालून चालून पाहिले पाहिजे आणि चालताना पिंढर्‍या आणि नितंबांवर जास्त जोर पडत असेल तर अशी चप्पल निवडू नये.

पाठीच्या मणक्यावर परिणाम होतो तो आपल्या बसण्याच्या पध्दतीचा तेव्हा बसतानासुध्दा खुर्ची कशी आहे, तिला आपली पाठ बरोबर चिकटत आहे की नाही आणि एकंदरीत बसण्याच्या पध्दतीमध्ये आपल्याला आराम मिळत आहे की नाही हे पहावे. त्याचबरोबर आपण एखाद्या खुर्चीवर कितीवेळ बसणार आहोत यालाही महत्त्व असते. आपण दीर्घकाळ खुर्चीवर बसणार असू तर दर दोनतीन तासांना १५ मिनिटांचा मध्यंतर केला पाहिजे. तेवढा वेळ खुर्चीतून उठून चालावे किंवा फेर्‍या माराव्या किंवा नुसतेच उभे रहावे. त्याऐवजी आपण कायम बसूनच राहिलो तर त्या बसण्याचा ताण आपल्या पाठीवर पडतो. तेव्हा खुर्ची चांगली असली पाहिजे, आपले बसणेही चांगले असले पाहिजे आणि बसण्याची वेळसुध्दा थोडी असली पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment