कॅन्सरपासून सावधान

cancer
मानवाने अनेक रोगांवर विजय मिळवला आहे. काही साथीचे रोग त्यांच्यावर लस शोधून काढून कह्यात आणले आहेत. पूर्वीच्या काळी प्लेग, कॉलरा, मलेरिया अशा साथींमध्ये एकाच वेळी हजारो लोक मरत असत. पण आता तसे वातावरण राहिलेले नाही. या रोगांच्या साथी येतही नाहीत आणि आल्या तरी प्रतिबंधक लसी आणि निवारक उपाय दोन्ही उपलब्ध असल्यामुळे त्या साथींपायी पूर्वीप्रमाणे हजारो लोक जिवास मुकत नाहीत. कर्करोगाच्या बाबतीत मात्र अजून मानवाला म्हणावे तसे यश आलेले नाही. कॉलरा किंवा मलेरिया यासारख्या विकारांच्या बाबतीत यश आले कारण ते विकार का होतात आणि कशामुळे याचा छडा माणसाला लागला. कर्करोगाचे तसे नाही. कर्करोग नेमका कसा होतो हेच माणसाला शोधता आले नाही. त्यामुळे कर्करोग प्रतिबंधक लसींचा शोध लावणे शक्य झालेले नाही आणि उपाययोजनासुध्दा हुकमी पध्दतीने उपलब्ध झालेल्या नाहीत. कर्करोग पहिल्या अवस्थेत माहीत झाला तर माणसाला काही प्रमाणात दिलासा देता येतो.

नंतरच्या अवस्थेतला कर्करोग मात्र दुरूस्त करण्याची हमी डॉक्टर देत नाहीत. कर्करोग कसा होतो हे माहीत नाही. तो शरीरात बळावण्याची प्रक्रिया नेमकी कशी सुरू होते आणि ती कशी अनियंत्रितपणे वाढत राहते याचे आकलन मानवाला झालेले नाही. मात्र त्यातल्या त्यात कर्करोग कशाने होतो याचा काही प्रमाणात अंदाज आलेला आहे. त्यामुळे कर्करोगाच्या या कारणाच्या संबंधात जनजागृती करण्याकरिता आज कर्करोग जागृती दिन पाळला जात आहे. ज्या विकारावर औषध उपलब्ध असते त्या विकाराच्या बाबतीत तुलनेने कमी काळजी करावी लागते. मात्र कर्करोगाच्यासारख्या विकारात उपाय उपलब्ध नसल्यामुळे पूर्व काळजीच अधिक गरजेची ठरते. म्हणून आज जगभरामध्ये कर्करोगाच्या कारणांच्याबाबतीत एक दिवस पाळला जात आहे. जगभर कर्करोगापासून कसे दूर रहावे या संबंधात लोकांना अवगत केले जात आहे. कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या जाणीव जागृतीची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे. भारतामध्ये २०१२ साली निरनिराळ्या प्रकारच्या कर्करोगांनी २१ हजार लोक मरण पावले होते. ही संख्या त्यापूर्वीच्या काही वर्षांमध्ये हळूहळू वाढत २१ हजारांपर्यंत आली होती. परंतु गेल्या दोन-तीन वर्षात कर्करोग पीडित लोकांच्या संख्येतली वाढ भयावह एवढ्या वेगाने होत आहे. २०१५ मध्ये देशात कर्करोगाने मरणार्‍यांची संख्या ४० हजारांवर पोहोचल्याचे आढळले आहे.

ज्याला कर्करोग होतो आणि दुसर्‍या किंवा तिसर्‍या अवस्थेत माहीत होतो त्याचा कर्करोग दुरूस्त करणे हे पूर्णपणे डॉक्टरांच्या हातात नाही. परंतु मुळात कर्करोग होऊच नये यासाठी काही दक्षता घेणे हे मात्र आपल्या हातात आहे. अशा दक्षतांमुळे कर्करोग अजिबात होणारच नाही अशी खात्री देता येत नाही. अनेक प्रकारच्या दक्षता घेऊनसुध्दा दक्षता घेणार्‍यांपैकी एक-दोन टक्के लोकांना कर्करोग होऊ शकतो. परंतु दक्षता घेणे गरजेचे आहे आणि त्यातून ९० टक्के लोकांना तरी कॅन्सरपासून मुक्तता मिळवून देता येते. कर्करोग नेमका कसा होतो याची प्रक्रिया माहीत नसली तरी कर्करोग हा बदलत्या जीवनशैलीचा परिपाक आहे. ही गोष्ट आता मान्य झाली आहे. धकाधकीचे जीवन, आचार आणि विचारातील अनिष्टतता त्याचबरोबर मांसाहार, दारू तसेच तंबाखूचे व्यसन ही कर्करोगाची कारणे आहेत. त्यापासून शक्य तेवढे दूर राहणे हेच कर्करोगापासून बचाव करण्यासाठी गरजेचे आहे. तंबाखू आणि दारूचे व्यसन असणार्‍यांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. त्यावरून बदलती जीवनशैली आणि तिच्यामुळे अपरिहार्य ठरणारी अशी व्यसने हे कर्करोगाचे कारण आहे, असे म्हणता येते.

कर्करोग असो की वाढते प्रदूषण असो ती विकासासाठी मोजली गेेलेली किंमत आहे. विकास हवा असेल तर प्रदूषण सहन करावे लागेल, प्रगती हवी असेल तर काही मनोकायिक विकार पत्करावेच लागतील असे निसर्गाचा नियम सांगतो. सध्या जिला आपण प्रगत शेती म्हणतो ती शेतीसुध्दा कर्करोगास कारणीभूत ठरली आहे. शेतीमध्ये उत्पन्न वाढवण्याकरिता रासायनिक खतांचा भरमसाठी वापर केला जातो. या रासायनिक खतांचे अंश पिकांमध्ये उतरतात आणि पिकांच्या माध्यमातून माणसांच्या शरीरात जाऊन तिथे कर्करोगाचे ठाणे निर्माण करतात. पिकांवर पडणार्‍या विविध रोग आणि कीडींचा बंदोबस्त करण्याकरिता जी कीटकनाशके पिकांवर फवारली जातात त्यांचेही अंश पिकांमध्ये उतरतात आणि माणसाच्या शरीरात जाऊन त्याच्या रक्तात कर्करोगाचे ठाणे निर्माण करतात. रासायनिक खतांच्या आणि कीटकनाशकांच्या वापराने धान्याचे उत्पादन वाढले परंतु धान्याची शुध्दता नष्ट झाली आणि प्रगत मार्गाने उत्पादित केलेले हे धान्य कर्करोगाचे कारण ठरले. याही संबंधात आज जनजागृती करून रसायन विरहित शेतीचा आदर्श निर्माण करावा लागणार आहे आणि खतांच्या ऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करण्यास लोकांना प्रवृत्त करावे लागणार आहे. अन्यथा कर्करोगाचे प्रमाण कर्करोगाच्या जंतूंप्रमाणेच समाजाच्या शरीरामध्ये अनिर्बंधपणे वाढत जाईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment