आल्याचे फायदे


आपल्या स्वयंपाकात वापरले जाणारे आले (अदरक) हे अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म बाळगून असते. आपल्या जवळ ते सदैव असते. कारण आपण भाजी खरेदी करायला जातो तेव्हा भाजीच्या सोबत कोथिंबीर, आले, लिंबू यांची जरूर खरेदी करीत असतो. आपल्या जवळ असले तरीही आपल्याला आल्याचे औषधी गुणधर्म माहीत असतातच असे नाही. तसे असले तरीही हिवाळ्यात आपण आल्याला विसरून चालणार नाही. कारण या ऋतूत आपल्याला आल्याच्या अनेक गुणधमार्र्ंचा फायदा घ्यायचा असतो. आले हे कफनाशक आणि शरीराला गरम ठेवणारे असते. त्यातल्या त्यात आल्यासोबत मधाचा वापर केल्यास त्याचे अनेक लाभ शरीराला होतात. आल्याला इंग्रजीत जिंजर म्हणतात. त्यात जिंगरोल्स आणि झिंगारोन ही दोन औषधी द्रव्ये असतात.

हिवाळ्यात आपण कितीही काळजी घेतली तरीही आपल्याला काही ना काही त्रास होतोच. हिवाळ्यातले त्रास हे शरीराचे तापमान कमी झाल्याने होत असतात म्हणून शरीराला उष्ण ठेवले की या ऋतूतले अनेक त्रास आपोआपच कमी व्हायला लागतात. त्यासाठी एक चमचाभर आल्याचा किस घ्यावा आणि तो दोन कप पाण्यात घालून हे पाणी उकळावे. साधारणतः दहा मिनिटे उकळत ठेवावे. ते नंतर थंड झाल्यावर त्यात मधाचे काही थेंब टाकावेत. दिवसातून दोन-तीन वेळा ते थोडे थोडे प्यावे. त्यामुळे शरीर गरम राहते. हाच प्रकार दुसर्‍याही मार्गाने करता येतो. उकळलेल्या पाण्यात आल्याचे तुकडे टाकावेत आणि नंतर हे पाणी थंड करावे. या पाण्याने तळपायाला १५ मिनिटे मसाज करावा. त्यामुळे पाय गरम राहतात.

सर्दी झाली असेल तर आले फार उपयुक्त ठरते. त्यासाठी आले आणि मधाचे सरबत तयार करावे. आधी चमचाभर मध घ्यावा आणि त्यात चार आल्याचे थेंब टाकावेत. म्हणजे या प्रकारात आले कमी आणि मध जास्त आहे. असा हा ज्युस तयार केल्यानंतर तो नीट ढवळावा आणि हे सरबत दिवसातून दोन ते चार वेळा थोडे थोडे प्यावे सर्दी कमी होते. छातीत जळजळ करत असल्यास आले उपयुक्त ठरते. त्यासाठी आल्याचे दोन-चार तुकडे ते चहात टाकावेत आणि चहा भरपूर उकळून तो प्यावा. त्यामुळे छातीतली जळजळ कमी होते. त्यापेक्षाही आल्याचे लहान लहान तुकडे करून ते जेवणापूर्वी तसेच किंवा मिठ लावून खावेत. त्यामुळे पोट दुखणे कमी होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment