आपण कसे झोपता?

sleep
आरोग्य उत्तम राहण्यासाठी भरपूर झोप घेतली पाहिजे. झोप शांतपणे लागली पाहिजे आणि झोपून उठल्यानंतर ताजेतवाने वाटले पाहिजे. हे तर खरेच आहे. पण आपण किती वेळ झोपता आणि किती शांतपणे झोपता याच्याबरोबरच आपण कोणत्या अवस्थेत झोपता यालाही आरोग्याच्यादृष्टीने महत्त्व आहे. उजव्या कुशीवर झोपणे हे सर्वात उत्तम अवस्था मानली जाते. पाठीचा कणा मान या दोन्हींच्या दृष्टीने ही अवस्था आदर्श आहे. मात्र अशा पोझिशनमध्ये झोपताना जास्त उशा वापरणे किंवा फार उंच उशी वापरणे टाळले पाहिजे. कारण उशी जेवढी उंच असेल तेवढे झोपणारा माणूस घोरण्याची शक्यता जास्त असते. शिवाय जास्त उशा किंवा उंच उशा वापरल्यास झोपत श्‍वास घ्यायलाही अवघड जाते.

उताणे झोपणे हीसुध्दा चांगली अवस्था मानली जाते. या अवस्थेत झोपल्याने पाठीची अवस्था चांगली राहते आणि या अवस्थेत झोपणार्‍याच्या चेहर्‍यावर लवकर सुरकुत्या पडत नाहीत. परंतु याही अवस्थेत घोरण्याची शक्यता जास्त असते. असे झोपता हाताची अवस्था काय ठेवतो यालाही महत्त्व असते. काही लोकांना उताणे झोपून दोन्ही हात डोक्याकडे नेऊन मिळवून ठेवण्याची सवय असते. म्हणजे आळस देताना जसे दोन हात वर जातात तशा अवस्थेत त्यांचे हात असतात. परंतु अशा प्रकारे हात डोक्याकडे नेण्याने खांद्यावर दबाव येतो. कधी कधी खांदे दुखतातसुध्दा.

काही लोकांना पालथे झोपण्याची सवय असते. पालथे झोपणे आरोग्यदायी मानले जात नाही. परंतु काही लोकांच्या मते पालथे झोपणार्‍यांचे अन्नपचन चांगले होते. असे असले तरी चेहरा उजवीकडे किंवा डावीकडे वळवावा लागतो आणि तो वळवलेल्या चेहर्‍याची दिशा बदलताना तोंडाला त्रास होऊ शकतो. या अवस्थेत मानेवरही जास्त दाब पडतो. पालथे झोपण्याचे फायदे असले तरी तोटेही भरपूर आहेत. पण हे तोटे कमी करण्यासाठी पालथे झोपणार्‍यांनी हाताखाली एखादी उशी घ्यावी. कुशीवर झोपणार्‍यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की या अवस्थेत झोपण्याचे यकृत, पोट आणि फुफ्फुसे यांच्यावर अनावश्यक ताण पडतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment