असा आहे शिवसेनेचा वचननामा


मुंबई – विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोमात असतानाच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई यांच्या उपस्थिती आज शिवसेनेने आपल्या पक्षाचा वचननामा जाहिर केला. या वचननाम्यात विचार करून वचने देण्यात आली आहे. शिवसेना जे बोलते ते करते. हा वचननामा राज्याच्या तिजोरीवर किती भार पडेल याचा विचार करूनच तयार करण्यात आला आहे. आम्ही १० रूपयांमध्ये अन्न देण्याचा घेतलेल्या निर्णयात बचतगटांची मदत घेणार आहोत. आम्ही जेवण १० रूपयांनी देण्याचा निर्णय तिजोरीवर किती भार पडेल हा विचार करून घेतला आहे. वचननामा समतोल ढळणार नाही याचा विचार करून तयार केला आहे. यातील एकही मत खोटे ठरणार नसल्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. आश्वासनांची खैरात शिवसेनेच्या या वचननाम्यात वाटण्यात आली आहे.

आम्ही १० रुपयांत चांगलं सकस जेवण, हे स्वच्छ आणि व्यवस्थित असेल आणि त्यामध्ये विशेषत: एका किचनमधून वितरण केले तरी महिला बचत गटांतील महिला त्यामध्ये सामावून घेतल्या जातील. २०० प्राथमिक आरोग्य चाचण्या ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत, त्यांची आरोग्य चाचणी एका रुपयांत आम्ही करतो, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. त्याचबरोबर हा वचननामा आम्ही राज्याच्या तिजोरीचा विचार करून बनवलेला आहे, पूर्णपणे जबाबदारीने हा वचननामा आखलेला आहे. यातील एकही वचन खोटे ठरणार नाही. प्रतिवर्ष १०००० रुपये दुर्बल घटक शेतकऱ्यांना देणार, हे सगळे करताना अत्यंत जबाबदारीने विचार केला असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

५ वर्षांचा आपला जो काही फिरण्याचा अनुभव, लोकांशी चर्चा आणि लाखो लोकांचे प्रश्न घेऊन जन आशीर्वाद यात्रेत आणि दुष्काळी दौऱ्यात लोकांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यांचे एकत्रीकरण आणि संकलन करून हा वचननामा बनवला असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच या वचननाम्यावर बारकोड आहे, जर बारकोड स्कॅन केला तर http://shivsenavachannama2019.com या वेबसाईटवर जाता येईल, असंही ते यावेळी म्हणाले.

शिवसेनेच्या वचनाम्यातील मुख्य घोषणा
१. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते.
२. ३० टक्क्यांनी कमी करणार ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे घरगुती वीज दर.
३. आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना मोफत शिक्षण.
४. ‘युवा सरकार फेलो’मार्फत राज्यातील १५ लाख पदवीधर युवकांना शिष्यवृत्ती
५. रोजगाराभिमूख शिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करणार.
६. वर्षाला १० हजार अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करणार.
७. तालुका स्तरावर गाव ते शाळा प्रवासासाठी विद्यार्थी एक्स्प्रेसची सुरूवात करणार.
८. प्रत्येक विद्यार्थ्याची मानसिक व शारीरिक तपासणी करणार.
९. नगरपरिषदा, नगरपालिके, महानगरपालिकेत रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद.
१०. ज्या ठिकाणी बससेवा नाही त्या ठिकाणी मुंबईप्रमाणे बससेवेची सुरूवात करणार.
११. सर्व राज्यांमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल उभारणार.
१२. ‘शिव आरोग्य योजने’अंतर्गत वन रूपी क्लिनिक सुरू करणार.
१३. राज्यात १ हजार ठिकाणी स्वस्त आणि सकस जेवण केंद्र स्थापणार.
१४. सरकारी नोकरीतील सर्व रिक्त पदे भरणार.
१५. राज्यातील प्रत्येक नागरिकाला ‘मुख्यमंत्री आवास योजने’अंतर्गत स्वत:चे घर देणार.

Leave a Comment