विष्णुदास भावे पुरस्काराने सन्मानित होणार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी


मुंबई – ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना मराठी रंगभूमीचा मानाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार ५ नोव्हेंबरला प्रदान करण्यात येणार आहे.

आजवर अनेक नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये रोहिणी हट्टंगडी यांनी भूमिका साकारल्या आहेत. तसेच, छोट्या पडद्यावरील मालिकांमध्येही त्यांची भूमिका पाहायला मिळते. आत्तापर्यंत त्यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, ‘अर्थ’ आणि ‘अग्निपथ’ या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार तसेच २०१७ मध्ये बालगंधर्व परिवारातर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. यंदाच्या विष्णुदास भावे या पुरस्कारावरही त्यांची मोहोर लागली आहे. प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते त्यांना २५ हजार रुपये रोख, विष्णुदास भावे पदक, स्मृती चिन्ह, शाल असे स्वरूप असलेला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही १९६० सालापासून ‘विष्णुदास भावे’ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करत आली आहे. दरवर्षी रंगभूमीदिनी दिवशी हे मानाचे पदक सांगली येथील ही समिती आणि राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दिले जाते. या पुरस्काराने मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्‍या ज्येष्ठ कलाकारास सन्मानित करण्यात येते.

Leave a Comment