जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यफेरीत मेरी कोमचा पराभव


उलान-उदे (रशिया) – जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील सहा वेळा जगज्जेती असलेली भारताची महिला बॉक्सिंगपटू मेरी कोमचे आव्हान संपुष्टात आले आहे. मेरीला ५१ किलो वजनी गटातील उपांत्य सामन्यात तुर्कीच्या बुसेनांज कारिकोग्लूकडून ४-१ ने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे तिचे ५१ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.

मेरीला या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असला तरी तिचे कांस्यपदक निश्चित झाले आहे. मेरी विरूद्ध दुसऱ्या सीडेड कारिकोग्लूने संयमी सुरुवात केली होती. पहिल्या फेरीत बचावात्मक खेळणाऱ्या मेरीने दुसऱ्या फेरीत आक्रमण केले. मात्र, कारिकोग्लूने तिला कोणतीही आघाडी घेऊ दिली नाही. कारिकोग्लूला अनेक वेळा मेरीने रिंग जवळ नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही खेळाडूंना कोणतेही यश मिळाले नाही.

अटीतटीच्या तिसऱ्या फेरीत पण कारिकोग्लूने दमदार सुरूवात केली. तिने उत्कृष्ठ जॅब आणि हुकच्या आधारावर मेरीविरुद्ध गुण मिळवले. बाऊट संपल्यानंतर, पाचही सदस्यांनी २८-२९, ३०-२७, २९-२८, २९-२८, ३०-२७ असे गुण दिले. या गुणांच्या आधारावर कारिकोग्लूला विजयी घोषित करण्यात आले. ४८ किलो वजनी गटात मेरीने सहा वेळा विजेतेपद पटकावले आहे.

Leave a Comment