धोनी निवृत्तीनंतरही तिसऱ्या कसोटी सामन्यात दिसणार


रांची : दक्षिण आफ्रिका विरोधात भारतीय क्रिकेट संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. भारत यात पहिल्या सामन्यात विजय मिळवत, दुसरा सामनाही खिशात घालण्याच्या तयारीत आहे. दरम्यान रांचीमध्ये तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना होणार आहे. रांची म्हटले की भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेट चाहत्यांना आठवतो. त्यामुळे धोनी या सामन्यात सहभागी होणार अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

2014मध्ये कसोटी क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेतली. धोनी सध्या फक्त एकदिवसीय आणि टी-20 संघाचा हिस्सा आहे. धोनी त्यातही गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेट खेळत नसल्यामुळे आता धोनी एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार का? असा सवाल चाहत्यांना पडला आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर धोनीने एकही सामना न खेळल्यामुळे धोनी थेट टी-20 विश्वचषक खेळणार असल्याच्या चर्चा आहेत.

दरम्यान, धोनी निवृत्तीनंतरही कसोटी सामन्यात दिसू शकतो. 19 ऑक्टोबरला रांची येथे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना होणार आहे. भारतीय संघ यासाठी 15 ऑक्टोबरला रांचीला पोहचेल. दरम्यान, या सामन्याच्या आयोजकांनी चाहत्यांना सराव पाहण्याची संधी दिल्यामुळे टीम इंडियाच्या सराव सत्रात धोनीही उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आयोजकांना याबाबत विचारले असता याबाबत त्यांनी मत व्यक्त करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पण सराव करताना धोनी दिसला नाही तरी, सामना पाहण्यासाठी नक्कीच उपस्थित राहू शकतो. सध्या टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तर, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0ने भारत आघाडीवर आहे.

Leave a Comment