महाबलीपुरमशी चीनचे इतके जुने आहे नाते


चेन्नईपासून जवळच असलेल्या, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामील असलेल्या आणि भारतातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ म्हणून लोकप्रिय असलेल्या महाबलीपुरम येथे जगातील दोन महाबली नेते भेटले आहेत. भारताचे पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भेटीने पुन्हा एकदा ही नगरी चर्चेत आली आहे. या ऐतिहासिक नगरीचे चीन बरोबर १७०० वर्षांचे नाते आहे. असे सांगतात, १८ व्या शतकात तत्कालीन पल्लव राजा आणि चीन शासक यांच्यात सुरक्षा करार झाला होता.


भल्या मोठ्या शिळा कोरून बनविलेली मंदिरे, रथ, अनेक सुंदर मूर्ती ही या नगरीची खास वैशिष्टे आहेत. ७ व्या शतकात पल्लव राजकाळात ही मंदिरे बांधली गेली असून रामायण, महाभारत यातील अनेक प्रसंग तेथे दगडातून कोरले गेले आहेत. दगडातून कोरले गेलेले रथ हे येथील विशेष आकर्षण. वराह गुहेतील अद्भूत मूर्तीवरून नजर हटविणे शक्य होत नाही.

विष्णूने महाबलीला वामनावतार घेऊन पाताळात ढकलले त्यावरून या नगरीला महाबलीपुरम असे नाव पडल्याचे सांगतात. पण या नगरीचे मूळ नाव मामल्लापुरम असे आहे. ७ व्या शतकातील राजा पल्लव नरसिंहदेव वर्मन अतिशय बलवान होता व त्यावरून या नगरला मामल्लापुरम म्हटले जात होते. या नगरीची स्थापना धार्मिक उद्देशाने केली गेली होती त्यामुळे येथे मंदिरे, स्मारके यांची रेलचेल आहे. बहुतेक मंदिरे शैव परंपरेतील आहेत.


पांडव अज्ञातवासात असताना काही काळ येथे राहिले होते असे मानले जाते. येथे रथ मंदिर समूह या नावाने जो मंदिर समूह आहे त्यात सहा रथ आहेत. त्यातील पांडवांचे पाच व एक द्रौपदीचा मानला जातो. हे सर्व रथ दगडातून कोरलेले आहेत. येथे एकूण ८ रथ, ९ गुफा मंदिरे, आहेत. शंकराकडून अर्जुनाने तपश्चर्या करून येथेच पाशुपतास्त्र मिळविले होते असे सांगितले जाते. दगडात ही घटना कोरली गेली असून त्यात शंकराला चार बाहू आहेत.


खडकांच्या भिंतीवर जी चित्रे कोरली गेली आहेत त्यात ६४ देवीदेवता, १ मंदिर, १३ मानसे, १० हत्ती, सोळा सिंह, ९ हरणे, २ बकऱ्या, दोन कासवे, २ ससे, एक रानडुक्कर, एक मांजर,१३ उंदीर, ७ पक्षी, चार माकडे, आठ झाडे यांचा समावेश आहे. येथेच गंगा पृथ्वीवर अवतरली तो देखावाही दगडात कोरलेला आहे. गोवर्धनधरी श्रीकृष्ण आहे. तसेच शिळेतून कोरलेल्या गणेश मंदिरात आजही पूजा अर्चा केली जाते.

Leave a Comment