श्‍वासावर लक्ष केंद्रित करा

meditation
श्‍वास माणसाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असतो. श्‍वास असतो म्हणून माणूस जिवंत असतो. श्‍वास थांबतो तेव्हा त्याचे जीवन संपते. म्हणून आपल्या जगण्याला दोन श्‍वासातले अंतर असे म्हटले जाते. मात्र हाच श्‍वास आपले आरोग्य कसे आहे. हे सूचित करत असते. म्हणजे एखाद्या माणसाची प्रकृती चांगली आहे की नाही हे त्यांच्या श्‍वासाच्या प्रकारावरून ठरत असते. त्याच बरोबर श्‍वासावर लक्ष केंद्रित करून श्‍वास चांगल्या प्रकारे घेतला तर आरोग्य सुधारण्यास मदतसुध्दा होते. म्हणजे श्‍वास चांगले आरोग्याचे द्योतकही आहे आणि चांगले आरोग्याचे साधनसुध्दा आहे. म्हणून नेहमीच श्‍वासावर लक्ष केंद्रित करावे.

श्‍वासाचे हे महत्त्व शास्त्रालाही मान्य आहे. त्यामुळे वैद्यकीय शास्त्रामध्ये श्‍वासाचेसुध्दा विशेषज्ञ कार्यरत झालेले आहेत. हे विशेषज्ञ श्‍वासाची फार छान चिकित्सा करत असतात. श्‍वास घेणे म्हणजे नाकातून किंवा तोंडातून प्राणवायू ओढून घेणे आणि उच्छवास म्हणजे याच मार्गाने कार्बनडाय ऑक्साईड सोडून देणे. त्यामुळे श्‍वासाशी आपले नाक, तोंड, श्‍वसननलिका आणि फुफ्फुसे यांचाच संबंध असतो असे बरेच लोक मानतात. मात्र विशेषज्ञ सांगतात की ज्या श्‍वासाने आणि उच्छवासाने केवळ छातीची हालचाल दिसते आणि जो माणूस फक्त छातीमध्ये हवा ओढून घेतो तो पूर्ण निरोगी नसतो.

एखादे लहान मूल शांतपणे झोपले म्हणजे त्याचा श्‍वास फार सावकाश चाललेला असतो आणि श्‍वासोच्छवासाच्या निमित्ताने त्याच्या पोटाच्यासुध्दा हालचाली होत असतात. म्हणजे ते लहान मूल पूर्ण निरोगी असते आणि पोटापासून श्‍वास घेत असते. जे लोक केवळ छातीपासून आणि छातीपर्यंतच श्‍वासोच्छवासाची प्रक्रिया घडवतात त्यांच्या या प्रक्रियेला उथळ श्‍वास म्हटले जाते. म्हणून शक्य तो पोटाच्या हालचाली होतील इतपत खोलवर श्‍वास घेतला पाहिजे. श्‍वासोच्छवास नाकातूनच केला पाहिजे. काही लोकांना तोेंडाने श्‍वास घेण्याची आणि तोंडानेच सोडण्याची सवय असते ती घातक असते आणि तिच्यामुळे तोंडाला कोरड पडते आणि उच्छवासाबरोबर बाहेर पडणे अपेक्षित असलेले विषारी घटक त्यातून बाहेर पडत नाहीत म्हणजे तोंडाने केलेला श्‍वासोच्छवास हा सदोष श्‍वासोच्छवास असतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment