वजन कमी करण्यातील अडचणी

weight-loss
वजन कमी करणे हे एक फार मोठे दिव्य असते. तरीही या संबंधातील जाहिरातीमध्ये थोडक्या अवधीत भरपूर वजन घटवण्याचे तोंडभरून आश्‍वासन दिलेले असते. त्या जाहिरातीनुसार ज्या कोणाला गुण आला असेल त्याला तो गुण लखलाभ असो पण आपण स्वतः वजन कमी करण्याचा प्रयत्न करायला लागतो तेव्हा ते काम किती अवघड आहे याचा अनुभव येतो. साधारणतः लोकांचा समज असा असतो की आपण जे काही खातो ते खाणे हेच आपले वजन वाढवण्यास कारणीभूत आहे. तेव्हा वजन कमी करायचे असेल तर आपण नेहमी जे खातो आणि जे आपल्याला आवडते ते खाणे बंद केले पाहिजे किंवा ते अतीशय कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे.

या उलट वजन कमी करण्यासाठी जे काही खाल्ले पाहिजे ते आपल्याला न आवडणारेच असणार. कारण शेवटी आपल्या सर्वांच्या मनावर असा एक विचार बिंबवला गेला आहे की औषध म्हटले की ते कडू असणारच. तेव्हा प्रकृती सुधारण्यासाठी कडू औषध घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि जे छान आहे ते औषध नसतेच. तसाच विचार वजन घटवताना केला जातो. मनाला आवडणार नाही असे चवदार नसलेले आणि नावडते अन्न खाणे हे अपरिहार्य असते असा तो विचार असतो. थोडक्यात सांगायचे झाले तर खाण्याच्या बाबतीत मन मारणे आवश्यक.

परंतु अशा प्रकारे मन मारल्यामुळे आणि कदान्न खाल्यामुळे वजन घटवणे हे एक आव्हान होऊन बसते आणि ती एक कटकट वाटायला लागते. आता तज्ञ मंडळींनी असा निर्वाळा द्यायला सुरूवात केली आहे की आवडते अन्न न खाणे हे आरोग्यास चांगले असते हा आपला गैरसमज आहे. वजन घटवायचे झाले तरी जे आपल्याला आवडते ते, आपल्याला मानवते ते अन्न खायला काही हरकत नाही. मात्र आपल्याला जे आवडते ते कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे. म्हणजे वजन नियंत्रणात राहते. विशेषतः भरपूर भूक लागल्याशिवाय काही खाऊ नये. दोन खाण्याच्यामध्ये अंतर असावे आणि दोन घासाची भूक बाकी ठेवून खावे. भूक लागल्याशिवाय खाऊ नये आणि भूक लागल्यास मात्र खायचे टाळू नये. तेव्हा काय खातो यापेक्षा किती खातो, किती अंतराने खातो याला जास्त महत्त्व आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment