डायनासोरचा विनाश सुरू झाला दख्खनेतून

dinasoure
कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील डायनासोर आणि अन्य प्राण्यांचा नाश कसा झाला, याबाबत संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या विनाशाची सुरूवात भारतातूनच झाली होती. त्यातही दख्खन म्हणजेच आज महाराष्ट्राचा समावेश असलेल्या भागाने यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

नवे तंत्रज्ञान वापरून केलेल्या शोधांच्या आधारे शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे, की महाकाय डायनासोर आणि अन्य प्राण्यांचा अंत एका फटक्यात झाला नव्हता. आतापर्यंत असे मानण्यात येत होते, की 6.6 कोटी वर्षांपूर्वी एक उल्का पृथ्वीवर आदळली. ही टक्कर एवढी जबरदस्त होती, की पृथ्वी थरथरली आणि जीवसृष्टी नष्ट झाली. ही टक्कर जिथे झाली, तो भाग सध्या मेक्सिकोत येतो.

कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या 29 जीवाश्म आणि कवचांच्या परीक्षणानंतर मिशिगन यूनिवर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे, की ही टक्कर होण्यापूर्वीच संकटाला सुरूवात झालेली होती. या जीवाश्मांमध्ये 65 लाख वर्षांचा इतिहास दडलेला आहे. मिशिगन यूनिवर्सिटीच्या शास्त्रज्ञ सियेरा पीटरसन, कीगर लोहमन आणि यूनिवर्सिटी ऑफ फ्लोरिडाच्या शास्त्रज्ञ अँड्रन डटन यांनी हे संशोधन केले असून अलीकडेच ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात ते प्रसिद्ध झाले आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, सर्वात आधी एका विशाल ज्वालामुखीचा उद्रेक झाला. हा ज्वालामुखी सध्या भारताच्या दख्खन भागात होता. इतिहासातील हा सर्वात मोठा ज्यालामुखी मानण्यात येतो.

“ज्लावामुखीमुळे पर्यावरणावर ताण येऊन ते एवढे दुर्बळ झाले होते, की एका टकरीत ते उध्वस्त झाले,” असे पीटरसन यांनी सांगितले. या ज्वालामुखीतून हजारो वर्षांपर्यंत विषारी गॅस आणि अब्जावधी टन राख बाहेर पडत होती. स्फोट आणि गरम लाव्हा यांमुळे समुद्राचे तपमान 7.8 डिग्री सेल्सियसनी वाढले. त्यातून संपूर्ण वातावरणात राख पसरली आणि पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पसरेनासा झाला. त्यानंतर तपमान कमी होऊन सर्व काही गोठण्यास सुरूवात झाली. डायनासोरसह 24 प्राण्यांच्या जातींना याचा त्रास होऊ लागला आणि प्राण्यांच्या 10 जाती तर तेव्हाच नष्ट झाल्या.

ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या हवामान बदलाचा 14 जातींनी कसाबसा सामना केला. परंतु त्यानंतर 1.5 लाख वर्षांनी आकाशातून आलेली एक उल्का पृथ्वीला धडकली. या टकरीमुळे संपूर्ण पृथ्वीवर भूकंपीय लहरी पसरल्या. हवामान बदलाचा आणखी एक टप्पा सुरू झाला आणि उरलेल्या 14 जातीही नष्ट झाल्या. या हवामान बदलाचा परिणाम पृथ्वीवर 35 लाख वर्षांपर्यंत राहिला.

Leave a Comment