ठाणे रेल्वे स्टेशनच्या वन रूपी क्लिनिक मध्ये झाला बालजन्म


प्रवासात अचानक प्रसुती होऊन बाळ जन्माला येण्याची घटना अनेकदा घडते. ठाणे रेल्वे स्टेशनवर कर्जत परळ असा प्रवास करत असलेल्या एका गर्भवतीला अचानक प्रसुती वेदना होऊ लागल्याने ठाणे रेल्वे स्टेशन वरील १ रूपी क्लिनिक मध्ये नेले गेले आणि तिथे तिने एका गुटगुटीत मुलाला जन्म दिल्याची घटना नुकतीच घडली. बाळ बाळंतीण स्वस्थ असून बाळाच्या जन्मानंतर त्या दोघांना दुसऱ्या रुग्णालयात हलविले गेले आहे. सहा महिन्यापूर्वी याच प्रकारे इशरत शेख नावाची महिला तिच्या नातेवाईकासोबत नेहमीच्या तपासणीसाठी रेल्वेतून जात असताना तिला प्रसुती वेदना सुरु झाल्या होत्या तेव्हा स्टेशनवरच तिला स्ट्रेचरवरून नेऊन चिकित्सा सुविधा पुरविली गेली होती.

महाराष्ट्रात तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या काळात मुंबईतील रेल्वेस्थानकावर या प्रकारची तातडीची वैद्यकीय सेवा देणारी केंद्रे सुरु केली गेली असून त्यांना वन रूपी क्लिनिक असे म्हटले जाते. या वैद्यकीय केंद्रात सर्व सुविधा असून ठाणे केंद्राची सुरवात २०१७ मध्ये झाली आहे. चोवीस तास ही केंद्रे सेवा देतात आणि दररोज किमान ३०० प्रवासी त्याचा लाभ घेतात असेही समजते.

ठाणे वन रूपी सेंटरवर तीन डॉक्टर असून येथे बहुतेक सर्व चाचण्या बाहेरच्या हॉस्पिटलच्या तुलनेत अगदी कमी पैश्यात केल्या जातात असे डॉ. हिमांशु त्रिवेदी यांनी सांगितले. ते म्हणाले येथे रक्त चाचण्या, ईसीजी, सिटी स्कॅन, एमआरआय, एक्स रे, सोनोग्राफी या चाचण्याही केल्या जातात. नागरिक १०० रुपये भरून वार्षिक सभासदत्व घेऊ शकतात. त्यांना चाचण्यात ४० टक्के तर औषधांवर १० टक्के सवलत सुद्धा दिली जाते. मुंबईतील १४ रेल्वे स्टेशनवर अशी सुविधा उपलब्ध आहे.

Leave a Comment