रोजवापराचे विमान तयार करणार जर्मनीतील स्टार्टअप कंपनी

europen-space-agency
बर्लिन – अतिशय हलके व्यक्तिगत वापराचे एक विमान जर्मनीमधील एक स्टार्टअप कंपनी तयार करीत असून ते विजेवर चालणारे असेल. ते सरळ वरती उडेल व तसेच खालीही येऊ शकेल, त्याला धावपट्टीची गरज लागणार नाही. तुमच्या घराच्या बगिचातूनही उड्डाण करू शकेल असे हे विमान पर्यावरणस्नेही असणार आहे. दोनच जण या विमानात बसू शकतील शिवाय त्यात एक डक्ट फॅनही असणार आहे त्यामुळे ते नेहमीच्या हेलिकॉप्टरपेक्षाही अधिक साधे व सुरक्षित असेल.

युरोपीयन स्पेस एजन्सीच्या अंतर्गत सुरू असलेल्या लिलम या स्टार्ट अप कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनिएल विगँड यांनी सांगितले की, विमान तयार करण्याचा आमचा हेतू रोजच्या जीवनात वापरता येईल असे विमान तयार करण्याचा आहे, विमानतळ किंवा इतर सुविधा ज्या विमानाला लागणार नाहीत असे हे विमान असेल. त्याचा पायाभूत खर्चही फार नसेल. आवाज व प्रदूषण कमी करण्यासाठी त्यात इलेक्ट्रिक इंजिनचा वापर केला जाईल त्यामुळे ते शहरी भागात वापरता येईल.

ही स्टार्टअप कंपनी म्युनिक विद्यापीठाच्या चार पदवीधर मुलांनी स्थापन केली आहे. हे विमान अतिशय कार्यक्षम राहील व त्याचा पल्ला ५०० किलोमीटर इतका असेल. ते २०१८ साली विक्रीस उपलब्ध होणार आहे. त्यात टचस्क्रीनचा वापर करण्यात येत असून फ्लाय बाय वायर जॉयस्टीक नियंत्रण, र्रिटॅक्टेबल लँडिग गिअर, विंग डोअर्स, मोठी साठवणक्षमता, पॅनोरॅमिक विंडोज व उत्तम बॅटरी ही या विमानाची वैशिष्टय़े असतील. त्याची बॅटरी प्लगने भारित (चार्ज) करता येईल. या विमानाची छोटी आवृत्ती तयार करण्यात आली असून त्याच्या चाचण्या सुरू आहेत. मोठे मानवरहित विमान उन्हाळ्यात तयार केले जाईल असे एझेडओचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉर्नस्टेन रूडॉल्फ यांनी सांगितले.

ही कंपनी युरोपीय स्पेस एजन्सी अंतर्गत काम करते. लिलम कंपनीची विमानाची संकल्पना प्रत्यक्षात आणली जाईल व त्याला पुरेसा व्यवसाय मिळेल. त्यांचा चमू विमान क्षेत्रात तज्ज्ञ आहे पण तरी आम्ही त्यांना व्यवसायातील तज्ज्ञ मार्गदर्शन देऊ असे त्यांनी सांगितले. या विमानाची किंमत आज उपलब्ध असलेल्या त्याच आकाराच्या विमानापेक्षा कमी असेल यात शंका नाही असे युरोपीय स्पेस एजन्सीचे म्हणणे आहे. आगामी काळात ही विमाने केवळ श्रीमंतांकडेच असतील असा भाग नाही तर अनेक लोक त्यांचा वापर करू शकतील असे डॅनिएल यांचे म्हणणे आहे. रोज आपण जशी मोटार वापरतो तसे विमान वापरता येणार आहे त्यासाठी धावपट्टी वगरे काही लागणार नाही. आहे त्या ठिकाणाहून ते सरळ वर उडेल व उतरतानाही तसेच सरळ खाली येईल असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment