दुसरी कसोटी पहिल्या दिवसअखेर भारताच्या ३ बाद २७३ धावा


पुणे – भारताने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा सलामीवीर मयांक अग्रवाल याचे शतक (१०८) आणि त्याला चेतेश्वर पुजारा (५८) व कर्णधार विराट कोहली (नाबाद ६३) यांची लाभलेली साथ याच्या बळावर सामन्यावर पकड निर्माण केली. त्यामुळेच भारताला आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर ३ बाद २७३ धावांपर्यंत मजल मारता आली.

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने घेतला. पण या सामन्यात भारतीय संघाची खराब सुरुवात झाली, पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत शतके झळकावणाऱ्या रोहित शर्माला कगिसो रबाडाने क्विंटन डी-कॉकच्या हाती झेल द्यायला भाग पाडल्यानंतर मयांक-पुजारा जोडीने खेळपट्टीवर जम बसवत भारतीय डावाला आकार दिला. दुसऱ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी १३८ धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपली अर्धशतके पूर्ण केली. अखेरीस कगिसो रबाडाने चेतेश्वर पुजाराला माघारी धाडत भारताची जमलेली जोडी फोडली.

पुजारा नंतर मैदानावर आलेल्या कर्णधार विराटने चांगली खेळी करत सामन्यात रंगत आणली. या दरम्यान मयांक अग्रवालने मालिकेतील सलग दुसरे झळकावले. पण तोदेखील १०८ धावांवर माघारी परतला. रबाडानेच त्यालाही तंबूचा रस्ता दाखवला. पण आपला खेळ सुरू ठेवत विराटने अर्धशतक झळकावले आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्यासोबत सावध खेळ केला. सध्या विराट ६३ धावांवर तर रहाणे १८ धावांवर खेळत आहे.

Leave a Comment