कोट्यावधी संपत्तीचे मालक आहेत एन्काऊंटर स्पेशालिस्ट


मुंबई : शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये मुंबईच्या नालासोपारा भागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आणि ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांची संपत्ती त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रातून प्रदीप शर्मा यांनी आपल्या आणि पत्नी स्वीकृती हिच्या संपत्तीची माहिती दिली आहे. आपली कौटुंबिक संपत्ती ३६.२१ करोड रुपये असल्याचे काही वर्षांपूर्वी पोलीस दलात कार्यरत असलेल्या प्रदीप शर्मा यांनी घोषित केली आहे. राज्य पोलीस दलाचे १९८३ च्या बॅचचे प्रदीप शर्मा अधिकारी होते.

उमेदवारी अर्जासोबत प्रदीप शर्मा यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात आपली जंगम मालमत्ता १.८१ कोटी रुपये आहे. तर पत्नीकडे १४.०२ करोड रुपयांची जंगम मालमत्ता आहे. प्रदीप शर्मा यांनी अचल संपत्तीमध्ये काहीही घोषित केलेले नाही. स्वीकृती यांच्या नावावर ६.२१ करोड रुपयांची कृषी जमीन आणि १२ करोड मूल्य असलेली व्यावसायिक इमारत असल्याची माहिती दिली आहे. अशा प्रकारे स्वीकृती यांच्या नावावर एकूण २०.३७ करोड रुपयांची स्थावर संपत्ती आहे.

प्रदीप शर्मा यांनी मिळकतीची माहिती देताना २०१८-१९ मध्ये आपले वार्षिक उत्पन्न ९.८३ कोटी रुपये तर पत्नीचे वार्षिक उत्पन्न ४१.६३ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत प्रदीप शर्मा यांच्यासोबतच माजी पोलीस उपायुक्त शमशेर खान पठान आणि गौतम गायकवाड हे देखील आपले भविष्य आजमावत आहेत. मुंबादेवी मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढणाऱ्या पठान यांनी ५.१७ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. तर शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंना टक्कर देणाऱ्या गायकवाड यांनी आपल्याकडे ३.२१ कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे.

Leave a Comment