पतीसोबत चित्रपटाची निर्मिती करणार ‘धक धक गर्ल’


आजवर आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ अर्थात माधुरी दीक्षितने चाहत्यांची मने जिंकली असून आता तिने अभिनयासोबतच निर्मितीक्षेत्रात प्रवेश केला आहे. माधुरी पती डॉ. श्रीराम नेणे यांच्यासोबत मिळून एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

माधुरी आणि तिच्या पतीचे काही फोटो चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये माधुरी आणि श्रीराम नेणे आपल्या निर्मितीखाली तयार होणाऱ्या चित्रपटाचा क्लॅपबोर्ड दाखवताना पाहायला मिळतात. या मराठी चित्रपटाचे नाव ‘पंचक’ असे आहे. जयंत जथर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, अभिनेता आदिनाथ कोठारे यामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करुन आपल्या निर्मितीखाली तयार होणाऱ्या चित्रपटाची माहिती माधुरीनेही शेअर केली आहे. बॉलिवूडमधून मराठी चित्रपटनिर्मितीमध्ये एन्ट्री करणारी माधुरी पहिलीच नाही. तर, तिच्यापूर्वीही अनेक बॉलिवूड कलाकरांनी निर्मितीक्षेत्रात एन्ट्री घेतली आहे. यामध्ये अभिनेता संजय दत्त, जॉन अब्राहम, यांचाही समावेश आहे. संजय दत्तच्या निर्मितीअंतर्गत तयार झालेल्या ‘बाबा’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Leave a Comment