एमबीएच कशाला हवे?

mba
एक काळ असा होता की एमबीए झालेल्या मुलांना आणि मुलींना नोकरीच्या क्षेत्रात मोठी किंमत होती. त्यांचे एमबीएच्या पदवीचे मार्क जेवढे जास्त तेवढा त्यांचा पगार जास्त असे समीकरण तयार झाले होते. परंतु आता एमबीए डिग्रीचे गुण मार्केटमध्ये निरर्थक ठरायला लागले आहेत. विशेषतः परदेशात जाऊन ही पदवी मिळवणारे विद्यार्थी पश्‍चात्ताप पावायला लागले आहेत. कारण अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये जाऊन ही पदवी मिळवण्यासाठी किमान ४० लाख आणि कमाल ७० लाख खर्च येत आहे. त्यामुळे एमबीएलासुध्दा चांगले पर्याय आहेत. हे लोकांच्या लक्षात यायला लागले आहे.

स्वतःचा रोजगार स्वतःच निर्माण करणे हा एमबीएला सगळ्यात चांगला पर्याय आहे. तेव्हा एमबीए होऊन नोकरी मागण्यापेक्षा स्वतःचा बॉस स्वतः बना असे म्हटले जात आहे. नव्याने उद्योगात पडणार्‍यांना धंद्यातल्या जोखमीची फार भीती वाटते. परंतु जोखीम असली तरी आणि धक्के चपटे बसत असले तरी तेसुध्दा माणसाला शहाणे करून जात असतात. तेव्हा अशा अपयशाला घाबरून स्वस्थ बसून चालणार नाही. स्वतःचा व्यवसाय स्वतः करण्याचे धाडस केलेच पाहिजे.

या जोखमीवरसुध्दा एक उपाय आहे तो म्हणजे अन्य कोणी नवा व्यवसाय सुरू करत असेल तर त्याच्या व्यवसायामध्ये म्हणजेच स्टार्ट अप बिझनेसमध्ये त्याचा भागीदार होणे. मग ही भागीदारी पैशातली असेल किंवा कामातली असेल. शक्य तो पैसा न गुंतवता आपल्या कौशल्याच्या जोरावर एखाद्या व्यवसायात भागीदारी मिळवावी. भागीदार म्हणून तिथे मिळालेला अनुभव फार मौल्यवान समजला जातो. त्यातून आपल्या कौशल्याचे महत्त्व आपल्याला कळतेच. परंतु व्यवसायाची आर्थिक आणि व्यवस्थापनाची बाजू आपल्याला कळायला लागते. ज्या कळण्याचा उपयोग स्वतःचा उद्योग उभा करताना होतो.

हेही जमत नसेल तर आपल्या कौशल्याचा वापर फ्री लान्स म्हणून करणे हा एक उपाय आहे. आपल्याकडे जे कौशल्य असेल त्या कौशल्यावरून छोटी छोटी कामे मिळवणे हे स्वातंत्र्य मिळवण्यादृष्टीने महत्त्वाचे असते. म्हणजेच शिक्षक म्हणून काम करण्यापेक्षा घरी जाऊन लोकांच्या खासगी शिकवण्या करणे जास्त उपयुक्त ठरते. कोठेही इलेक्ट्रिशियन म्हणून काम करण्यापेक्षा इलेक्ट्रिकल कामाचे कॉन्ट्रॅक्ट घेणे जास्त फायद्याचे ठरते. कॉपी रायटर म्हणून एखाद्या जाहिरात एजन्सीमध्ये नोकरी करण्यापेक्षा अनेक ठिकाणची कॉपी रायटिंगची कामे घरी बसून करावीत. त्यातून स्वातंत्र्यही मिळते आणि स्वतःची जाहिरात एजन्सी उभी करण्याचा आत्मविश्‍वास येतो.

Leave a Comment