शनीच्या चंद्रांची संख्या गुरूपेक्षा झाली जास्त


आपल्या सौरमंडळात असलेल्या बहुतेक सर्व ग्रहांना त्यांचे चंद्र आहेत. पृथ्वीला एकच चंद्र आहे आणि या चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेण्याचा प्रयत्न जगभरातील सर्व अंतराळ वैज्ञानिक करत आहेत. अमेरिकेच्या कार्नेगी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधील संशोधकांनी शनीभोवती फिरत असलेले नवे २० चंद्र शोधले आहेत. त्यामुळे शनीच्या चंद्रांची संख्या ८२ वर गेली आहे. या पूर्वी सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह गुरु होता. गुरूला ७९ चंद्र आहेत. आता हा मान गुरुकडून शनीकडे गेला आहे.

शनीच्या नव्या चंद्राना नावे सुचविण्याची एका स्पर्धा या विद्यापीठाने आयोजित केली असल्याचेही समजते. नव्याने शोधण्यात आलेल्या चंद्रांचा किमान व्यास ५ किमी आहे. गेल्या वर्षी १२ चंद्र शोधले गेले होते. अमेरिकेच्या हवाई द्वीपावर यासाठी एक दुर्बिण बसविली गेली असून तिच्या सहाय्यानेच या नव्या चंद्राचा शोध लागला आहे.

सर्वाधिक चंद्र असल्याचा मान गुरूच्या हातून गेला असला तरी अजूनही सर्वाधिक मोठा चंद्र असल्याचा मान गुरुकडेच आहे. शनीचा सर्वात लहान चंद्र ५ किमी व्यासाचा आहे तर गुरूचा सर्वात लहान चंद्र १.६ किमी व्यासाचा आहे. गुरूलाही अजून चंद्र असावेत असा खगोल शास्त्रज्ञाचा अंदाज आहे तसेच शनीच्या चंद्रांची संख्या १०० वर असू शकेल असाही अंदाज वर्तविला जात आहे. एखादा मोठा उपग्रह भंगला तर त्यापासून चंद्र बनतात. शनीच्या नव्याने सापडलेल्या चंद्राना शनीभोवती एक फेरी पूर्ण करायला २ ते ३ वर्षे लागतात असे समजते.

Leave a Comment