ब्रेड खाल्ल्याने होऊ शकतो कॅन्सर!

bread-cancer
नवी दिल्ली : सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्वायरमेंट या संस्थेने दररोज ब्रेड खाणा-यांना कॅन्सर हा आजार होऊ शकतो, असा धोक्याचा इशारा दिला असून या संस्थेने ब्रेड आणि पिझ्झामध्ये असलेल्या रासायनिक पदार्थांमुळे कॅन्सर होऊ शकतो, असा दावा केला आहे. दिल्लीतील काही कंपन्यांमध्ये उत्पादित होत असलेल्या ब्रेडचे नमुने सीएसई या संस्थेने तपासले. त्यामध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट असे धोकादायक रासायनिक घटक असल्याचे तपासणीत समोर आल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो, असे संस्थेने म्हटले आहे. पोटॅशियम ब्रोमेटच्या वापरावर जगातील अनेक देशांत बंदी आहे. मात्र, भारतातील अन्न प्रक्रियासंबंधीच्या कुचकामी कायद्यांमुळे भारतात त्याचा वापर सर्रास केला जात आहे. पोटॅशियम आयोडेटमुळे थायरॉईडसंबंधित अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे या दोन्ही रासायनिक घटकांच्या वापरावर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी होऊ लागली आहे.

सीएसईच्या पोल्युशन मॉनिटरिंग लॅबोरेटरीच्या अहवालानुसार, भारतीय ब्रेड उत्पादक कंपन्या पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेटचा वापर करतात. दरम्यान पीएमएलने दिल्लीतील प्रसिद्ध फास्ट फूड आऊटलेटमधील ३८ प्रकारच्या बे्रडच्या नमुन्यांची तपासणी केली आहे. ब्रेड हा गव्हाचे पीठ किंवा मैदाचा वापर करून बनविले जाते. हा ब्रेड प्रत्येक घरात पोहचतो. मग कसा काय कॅन्सर होऊ शकतो, असे अनेकांचे म्हणणे आहे, मात्र मैदा किंवा पीठाने कॅन्सर होत नाही, तर ब्रेड बनविण्यासाठी वापरण्यात येणा-या केमिकल्समुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे. या केमिकल्सवर अनेक देशात आधीपासूनच बंदी आहे.

अनेक देशात ब्रेड केमिकल्सवर बंदी ब्रेड बनविण्यात येणा-या पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट या केमिकल्सवर अनेक देशात बंदी आहे. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, चीन, श्रीलंका, ब्राजील, नायजेरिया, पेरू आणि कोलंबिया सारख्या अनेक देशात बंदी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे खाद्यान्नावर देखरेख ठेवणारी भारतातील एफएसएसएआय ही संस्था अजूनही मुग गिळून गप्प आहे.

दिल्लीत ३८ नमून्यांची चाचणी सीएसईने ब्रेडच्या तपासणीसाठी दिल्लीतील विविध भागातील ३८ ब्रेडचे नमूने तपासले. यामध्ये ब्रिटेनिया, हार्वेस्टर गोल्ड, इंग्लीश ओवन, परफेक्ट प्रीमियम सारख्या लोकप्रिय कंपन्यांचे ब्रेडचा समावेश आहे. त्यांच्या ब्रेडमध्ये धोकादायक केमिकल्स आढळून आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment