पॅसिव्ह स्मोकिंगसुध्दा धोकादायकच

smoking
जागतिक आरोग्य संघटनेने धूम्रपानामुळे होणार्‍या दुष्परिणामांची जाणीव लोकांना होण्यासाठी काही आकडेवारी प्रसिध्द केली आहे. तिच्यानुसार दरवर्षी जगात धूम्रपान आणि त्यामुळे होणारा कर्करोग यांना ५० लाख लोक बळी पडतात. धूम्रपानाचा हा थेट दुष्परिणाम आहे. परंतु धूम्रपान न करतासुध्दा जगभरात ६ लाख लोक धूम्रपानाच्या दुष्परिणामांना बळी पडत असतात. ते स्वतः धूम्रपान करत नाहीत. परंतु सतत त्यांच्या जवळ बसणारी व्यक्ती, मित्र, जोडीदार किंवा पालक धूम्रपान करत असतात आणि त्यांनी ओढलेल्या सिगारेटचा धूर त्याच्या जवळ बसणार्‍या व्यक्तीच्या फुफ्फुसात शोषला जातो. ते स्वतःच धूम्रपान करत नसले तरी त्यांच्या शरीरात धूर जातो. अशा लोकांना इंग्रजीमध्ये एक वेगळा शब्द आहे.

जो स्वतः सिगारेट ओढतो तो ऍक्टिव्ह स्मोकर असतो आणि जो स्वतः सिगारेट ओढत नाही मात्र धूर मात्र आत घेतो तो पॅसिव्ह स्मोकर असतो. विशेष म्हणजे भारतात ऍक्टिव्ह स्मोकरची संख्या तर मोठी आहेच परंतु पॅसिव्ह स्मोकरचीही संख्या मोठी आहे. कारण आपल्या देशात सिगारेट किंवा विडी ओढणारे लोक चारचौघात धूम्रपान करणे वर्ज्य मानत नाहीत. म्हणजे ते स्वतःही धूम्रपान करतात आणि आपल्या शेजारी उभ्या असलेल्या, बसलेल्या आणि ऐनकेन प्रकारेण संपर्कात येणार्‍यांना धुराचा प्रसाद देत असतात. अशा पॅसिव्ह स्मोकरना धूम्रपान करणार्‍याइतकाच धोका असतो. त्यांनाही कर्करोग किंवा मूत्रपिंडाचे विकार उद्भवतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment