ग्रेटा थनबर्ग नोबेल शांतता पुरस्कारासाठी बुकींची पहिली पंसती

या आठवड्यात शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर होणार असून, बुकींच्या मते यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार स्वीडनची 16 वर्षीय पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गला मिळण्याची शक्यता आहे. मात्र तंज्ञांमध्ये या मुद्यावरून मतभेद आहे.

16 वर्षीय ग्रेटा थनबर्गला याआधी देखील एमेन्सटी इंटरनॅशनलचा सर्वोच्च पुरस्कार, द राइट लाईव्हहूड पुरस्कार देखील मिळालेला आहे. ऑनलाईन बेटिंग साईट लॅडब्रोक्सच्या यादीत ग्रेटा थनबर्ग या पुरस्कारासाठी पहिली पंसती आहे.

स्विस ब्रॉडकास्टर आरटीएसला दिलेल्या मुलाखतीमध्ये ग्रेटाने जर तिला हा पुरस्कार मिळाला तर तिच्या या चळवळीला नक्कीच अधिकृत मान्यता मिळेल असे तिने म्हटले होते. तसेच एखादा पुरस्कार किंवा बक्षीस मिळावे म्हणून ती हे करत नाही, असेही तिने म्हटले होते.

मागील वर्षी ऑगस्टमध्ये तिने प्रत्येक शुक्रवारी स्विडन संसदेच्या समोर बसून पर्यावरणसाठी आंदोलन करण्यास सुरूवात केली होती. तिच्यापासून प्रेरणा घेत जगभरातील विद्यार्थ्यांनी क्लायमेट स्ट्राईक करण्यास सुरूवात केली. तसेच, मागील महिन्यात संयुक्त राष्ट्राच्या हवामान परिषदेत केलेल्या भाषणामुळे देखी ती चर्चेत आली होती.

शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी बुकींची पंसती ग्रेटा थनबर्गला असली तरी अनेक तज्ञांमध्ये याबाबत मतभेद आहेत. अनेकांच्या मते तिला मलाला युसुफजाईप्रमाणेच विभागून हा पुरस्कार दिला जाईल तर काहींच्या मते तिचे वय कमी असल्याने कदाचित पुरस्कार न मिळण्याची शक्यता आहे.

तर काही जणांच्या मते तिने मागील वर्षात पर्यावरण बदलाची समस्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी जे काही केले आहे ते अविश्वसनीय आहे.

Leave a Comment