जिओची मोफत कॉलची सेवा होणार बंद!


नवी दिल्ली – प्रतिस्पर्धी नेटवर्क म्हणजेच एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यांच्या मोबाईलवर रिलायन्स जिओच्या नंबरवरून फोन केल्यास ग्राहकांना लवकरच सहा पैसे प्रतिमिनिट शुल्क द्यावे लागणार आहे. जिओ मोबाईलवरून आतापर्यंत कोणत्याही नेटवर्कवर किंवा लँडलाईनवर फोन करणे मोफत होते. पण त्यामध्ये बदल करण्यात येणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून जोपर्यंत इंटरकनेक्ट युसेज शुल्क पूर्णपणे माफ केले जात नाही. तोपर्यंत ग्राहकांना इतर नेटवर्कवर फोन केल्यास त्याचे शुल्क द्यावे लागेल. पण त्याबदल्यात ग्राहकांना तेवढ्याच किमतीचा जास्तीचा डेटाही उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

रिलायन्स जिओने गेल्या तीन वर्षांमध्ये इंटरकनेक्ट युसेज शुल्क म्हणून सुमारे १३,५०० कोटी रुपये इतर नेटवर्क कंपन्यांना दिले आहेत. सध्या दिवसाला जिओच्या मोबाईलवर २५ ते ३० कोटी मिस्ड कॉल येतात. इतर नेटवर्कला जिओवरून फोन करणे मोफत असल्यामुळे दुसरे नेटवर्क वापरणारे ग्राहक जिओच्या नंबरवर मिस्ड कॉल देतात. यानंतर जिओच्या नंबरवरून इतर नेटवर्कला प्रतिदिन ६५ ते ७० कोटी मिनिटांचे फोन केले जातात. वास्तविक हे ६५ ते ७० कोटी मिनिटांचे कॉल बाहेरच्या नेटवर्कवरून जिओच्या क्रमांकावर येणारे असायला हवेत. पण तसे होत नसल्यामुळेच इंटरकनेक्ट युसेज शुल्क वाढते.

कोणतेही शुल्क जिओ ते जिओ, जिओ ते लँडलाईन त्याचबरोबर इनकमिंग कॉल्स यांच्यावर असणार नाही. हे सर्व कॉल्स मोफत असतील, असे रिलायन्स जिओने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअॅप, फेसटाईमचा वापर करून केलेले कॉल्सही मोफत असतील, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment