पहिल्या राफेल विमानामधून संरक्षणमंत्र्यांनी घेतले उड्डाण

सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल दसऱ्याच्या मुहर्तावर फ्रान्सकडून पहिले राफेल विमान घेतले. यावेळी राजनाथ सिंह यांनी पारंपारिक पध्दतीने शस्त्रास्त्र पुजन देखील फ्रान्समध्ये केले. यावेळी राजनाथ सिंह यांनी 25 मिनिट लढाऊ राफेल विमानातून उड्डाण घेतले. यावेळी त्यांनी हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे.

राजनाथ सिंह म्हणाले की, आम्ही कोणत्याही अन्य देशांना धमकवण्यासाठी हत्यार अथवा अन्य संरक्षण साठा खरेदी करत नाही. तर आम्ही आमची क्षमता वाढवण्यासाठी व वायुदलाला अधिक मजबूत करण्यासाठी हे खरेदी करतो. राफेल विमानाचे श्रेय हे निश्चितच पंतप्रधान मोदींना जाते. त्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळेच देशाच्या सुरक्षेला फायदा झाला आहे.

याशिवाय राजनाथ सिंह यांनी राफेल विमानातील उड्डाण ही आपल्यी जीवनातील एक अविस्मरणीय असा क्षण असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, मी कधी कल्पना देखील केली नव्हती की, मी  सुपरसोनिक स्पीडमध्ये उड्डाण घेईल. ही खूपच आरामदायी आणि सुगम उड्डाण होती. या दरम्यान या लढाऊ विमानाची क्षमता, हवेतूनच हवेत मारा करण्याची क्षमता आणि जमीनीवर लक्ष्य भेदण्याची क्षमता पाहू शकलो.

फ्रान्स दौऱ्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती एम्युनल मॅक्रोन यांची देखील भेट घेतली. दसऱ्याच्या मुहर्तावर आणि वायुदलाच्या 87 व्या वर्धापन दिनानिमित्ताने राफेल विमान भारतीय वायुदलात सहभागी झाले असून, यामुळे वायुदलाची ताकद आणखी वाढणार आहे. 2022 पर्यंत फ्रान्स 36 राफेल विमान भारताला सोपवणार आहे.

Leave a Comment