क्लाऊड पासपोर्टच्या सहाय्याने करा परदेश प्रवास

passport
पासपोर्ट बरोबर बाळगल्याशिवायच परदेश प्रवासाची कल्पना कशी वाटते? ही कल्पना लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यासाठी क्लाऊड तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. जगभरात सर्वप्रथम अशा पासपोर्टसाठीच्या ट्रायल ऑस्ट्रेलियात सुरू झाल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री जूली बिशप या संदर्भात माहिती देताना म्हणाल्या, ऑस्ट्रेलियन नागरिक जगात सर्वप्रथम पासपोर्ट जवळ बाळगल्याशिवाय परदेशी प्रवास करू शकणार आहेत. पारंपारिक परदेश प्रवासासाठी लागणारी कागदपत्रे आणि पासपोर्ट क्लाऊड पासपोर्टशी जोडली जाणार आहेत. यात प्रवाशांची खासगी माहिती सुरक्षा हा मोठा मुद्दा आहे. मात्र तरीही या मुळे पासपोर्ट चोरीस जाणे अथवा गहाळ होणे हा धोका संपणार आहे.

ऑस्ट्रेलियात 2014-15 या काळात 38718 पासपोर्ट चोरीस गेले आहेत अथवा गहाळ झाले आहेत. क्लाऊड पासपोर्टसाठी ऑस्ट्रेलियाने 140 दशलक्ष डॉलर्स खर्चाचा हा प्रकल्प मे महिन्यातच सुरू केला आहे. यात पासपोर्टधारकाची सर्व माहिती व बायोडेटा ऑनलाईन स्टोअर केला जाणार आहे. फिंगरप्रिंट, डिजिटल फोटो, जन्मतारीख, पासपोर्टची एक्स्पायरी डेट यासह ही माहिती असेल. अर्थात कस्टम अधिकारी ही माहिती पाहू शकणार आहेत. या कलाऊड पासपोर्टची पहिली चाचणी घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड सरकार संपर्कात आहेत.

Leave a Comment