आयुर्मान वाढतेय

healthy
माणूस शतायुषी व्हावा आणि त्याचे शंभर वर्षाचे आयुष्य निरामयपणे त्याला जगता यावे यासाठी शास्त्रज्ञ बरेच प्रयत्न करत आहेत. त्या दृष्टीने म्हातारपणास कारणीभूत ठरणार्‍या शरीरातील प्रक्रिया मंद कशा करता येतील यावर संशोधकांचे स्वतंत्र प्रयत्न जारी आहेत. त्यात कितपत यश येईल, ते कधी येईल आणि त्यामुळे माणसाचे आयुर्मान नेमके किती वाढेल हे काही आताच सांगता येत नाही. मात्र संशोधनाने काहीही साध्य होऊ शकते हे नाकारता येत नाही. कदाचित माणसाला अमर करण्याचे संशोधनही सिध्दीस जाऊ शकते. अर्थात या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. तूर्तास एकंदर आरोग्याच्या सोयी विपुलतेने उपलब्ध झाल्यामुळे माणसाचे सरासरी आयुर्मान वाढत चालले आहे. या दृष्टीने काही पाश्‍चात्य देशांचे पाहणी केली असता तिथे नागरिकांचे सरासरी आयुर्मान ८० वर्षांच्या पुढे गेले असल्याचे दिसून आले आहे.

भारतातही सरासरी आयुर्मान पूर्वी अवघे ३९ वर्षे होते आणि ८० ते ८५ वर्षांच्या पुढे जगलेल्या लोकांची संख्याही फार कमी असायची. नव्वदी ओलांडलेले लोक तर अगदी दुर्मिळ असायचे आणि शतायुषी व्यक्ती ही खळबळजनक बातमी ठरायची. वयाची पन्नाशी ओलांडली की लोक वृध्दावस्था आली असे समजायचे आणि ५५ ते ६० वर्षांच्या दरम्यान लोक निरवानिरवीची भाषा सुरू करायचे. याच वयामध्ये निम्म्या गवर्‍या मसणात गेल्या असे शब्द प्रयोग केले जायचे. पण आता भारतीयांचेही सरासरी आयुर्मान वाढले आहे आणि ते ५९ वर्षे झालेले आहे. ८० च्या पुढे गेलेले लोक सरसकट बघायला मिळत आहेत. नव्वदी ओलांडलेली लोकही सामान्य व्यवहार करताना दिसत आहेत. शतायुषी माणूस ही बातमी राहिलेली नाही.

एकंदरीत मानवाचे आयुर्मान वाढले आहे. मात्र त्यातल्या त्यात महिलांच्या आयुष्याच्या मर्यादा पुरुषांपेक्षा जास्त आहे. पुरुष ६० वर्षाचा झाला की निवृत्त होतो आणि त्याच्या हालचाली कमी होतात. महिलांचे मात्र तसे नसते. त्या कधी निवृत्त होत नाहीत. त्या वृध्द झाल्या तरी त्यांचे घरकाम संपत नाही. त्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक तेवढा व्यायाम मिळतो आणि त्यामुळे त्या पुरुषांपेक्षा अधिक जगतात. हृदयविकारांच्या बाबतीतसुध्दा असेच आढळले आहे. हृदयविकाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांत कमी आहे. जीवनातली सुखदुःखे पचवण्याची क्षमता पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असते. त्यामुळे त्या रक्तदाब, हृदयविकार अशा मनोकायिक विकारांना बळी पडत नाहीत. हेही त्यांच्या तुलनेने अधिक असलेल्या आयुर्मानाचे कारण असावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment