वडीलांच्या आगामी चित्रपटात मुख्य भुमिकेत झळकणार जान्हवी


सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची चर्चा पाहायला मिळते. बऱ्याच स्टारकिड्सनी मागील वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘धडक’ चित्रपटातून बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी हिनेही बॉलिवूड पदार्पण केले होते. तिची या चित्रपटानंतर बऱ्याच चित्रपटांमध्ये वर्णी लागली आहे. आता ती बोनी कपूरच्या आगामी चित्रपटामध्येही मुख्य भूमिका साकारणार आहे.

याबाबतची माहिती सोशल मीडियावर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केली आहे. ‘बॉम्बे गर्ल’ असे बोनी कपूर यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय त्रिपाठी हे करणार आहेत. तर, या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर आणि महावीर जैन हे करतील.

जान्हवी या चित्रपटाशिवाय करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटातही भूमिका साकारणार आहे. तसेच, ती ‘कारगिल गर्ल’मध्ये गुंजन सक्सेना यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे काही पोस्टरही काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याचबरोबर ती कार्तिक आर्यनसोबतही ‘दोस्ताना’ च्या सिक्वेलमध्ये झळकणार आहे.

Leave a Comment