वायुदलाच्या वर्धापन दिनानिमित्ताने अभिनंदन यांनी मिग-21 मधून घेतली गगन भरारी

आज भारतीय वायुदलाच्या 87 व्या वर्धापन दिनानिमित्ताने गाझियाबादच्या हिंडन एअरफोर्स स्टेशनवर वायुदलाने शक्तीप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला वायुदलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच दुसऱ्या देशातील सैन्य अधिकारी देखील उपस्थित होते. एअर शोमध्ये सर्वात प्रथम लढाऊ हेलिकॉप्टर अपाचे आणि हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर चिनूकने आपली ताकद दाखवली. यावेळी पाकिस्तानी वायुदलाचे एफ-16 विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन यांनी देखील मिग-21 द्वारे प्रात्यक्षिक दाखवली.

वायुदलाच्या वर्धापना दिनानिमित्ताने त्यांनी मिग-21 हे विमान उडवले.  अभिनंदन यांच्या कामगिरीसाठी त्यांना वायुदलाकडून सन्मानित देखील करण्यात आले.

भारतीय वायुदलातील आकाशगंगा टीम, गरूड कमांडो युनिट, एअऱ वॉरियर शो आणि जुन्या ट्रेनर विमानांपासून ते मेक इन इंडिया अंतर्गत बनवण्यात आलेल्या विमानांनी आपल्या कसरती दाखवल्या. एअर शोमध्ये टीम सारंगने आकाशात हार्टची आकृती काढून दर्शकांचे मन जिंकले. एअर शोमध्ये अपाचे, चिनूक, डकोटा, तेजस, सुर्य किरण आणि वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी चित्तथरारक कसरती दाखवल्या. यावेळी वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया देखील उपस्थित होते.

Leave a Comment