झोपेला वंचित पिढी

sleep
नव्या पिढीचे सारे राहणीमान आणि जीवनशैली एवढे बदलून गेले आहे की एवढ्या बदलाने तिच्यासमोर अनेक आव्हाने उभी केली आहेत. पूर्वीच्या काळी लवकर निजे लवकर उठे अशी म्हण होती. पण आता लहान मुलांच्या झोपेच्या वेळा पार बदलून गेल्या आहेत. पूर्वी रात्री ८ वाजता डोळे झाकणारी मुले होती. पण आता टीव्हीच्या मालिकांमुळे ही वेळ ११ पर्यंत पुढे गेली आहे. मग झोपायची वेळ बदलल्यास लवकर निजे लवकर उठे ही म्हण बदलून उशिरा निजे उशिरा उठे अशी करावी लागली. मात्र शाळेच्या वेळांमुळे सगळे चित्र बदलून गेले आहे. मुलांची अवस्था उशिरा निजे लवकर उठे अशी झाली आहे. म्हणजे एकंदरीत आता लहान मुले आवश्यकतेपेक्षा २ ते ३ तास कमी झोपत आहेत. त्याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.

आपण रिक्षा किंवा वाहनांमध्ये बसून जाणारी लहान मुले पाहिली की आपणाला हे जाणवते. सकाळी ७ वाजता शाळा भरणार असते आणि साडेसहा ते पावणेसातच्या दरम्यान या मुलांना अर्धवट झोपेतून उठवून जबरदस्तीने शाळेत पाठवले जात असते. अशा वाहनांमध्ये पेंगुळलेल्या डोळ्यांचे आणि डुलक्या घेणारी मुले मोठ्या प्रमाणावर दिसतात. या मुलांची ही समस्या सोडवण्यासाठी त्यांची शाळेची वेळ बदलण्यात यावी अशी सूचना एका ब्रिटिश शास्त्रज्ञाने केली आहे. सकाळी ७ वाजता शाळा भरवण्याऐवजी लवकरात लवकर म्हणजे साठेआठ वाजेपर्यंत शाळा भरवावी. म्हणजे या मुलांना निदान सकाळी ७ वाजेपर्यंत तरी झोप मिळेल. पण शाळांच्याही काही अडचणी आहेत.

सध्या मोठ्या शहरांमध्ये शाळांना इमारती मिळत नाहीत. त्यामुळे शाळा दोन पाळ्यात चालवली जाते आणि लहान मुलांची शाळा सकाळी लवकरच भरवून १० ते ११ च्या सुमारास सोडून दिली जाते. तिथून शाळेची दुसरी पाळी सुरू होते. शिवाय पालकांनीही आपल्या मुलांवर निरनिराळ्या क्लासेसचे ओझे टाकलेले असतेच. त्या क्लासेससाठी मुले त्यांना दुपारी मोकळी हवी असतात. म्हणजे सकाळी शाळा आटोपली तर त्यांनाही बरेच वाटते. मात्र झोप अर्धवट होण्याने मुलांची वाढ खुंटते. मेंंदूचा विकास होत नाही. त्यांची ऍसिडीटी वाढायला लागते. ती अधिक अन्न खातात आणि ते पचले नाही म्हणजे वाढते वजन, मधूमेह असे विकार त्यांना जडायला लागतात. म्हणजे बदलत्या जीवनशैलीने उशिरा झोपणे आणि सकाळची लवकरची शाळा या दोन गोष्टी बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment